१२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीत सर्वाधिक काळे गटाचे ८ उपसरपंच बिनविरोध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून सर्वाधिक १६ सरपंच आ. आशुतोष काळे गटाचे निवडून आले आहेत. या सर्व ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये सर्वाधिक काळे गटाच्या ८ उपसरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यामध्ये माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, भोजडे, सडे, रांजणगाव देशमुख, वडगाव, मोर्विस, शहापूर, शिंगणापूर, वेस-सोयगाव, पढेगाव, खिर्डी गणेश या गावांच्या उपसरपंच पदाची निवडणूक नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या निवडणुकीत काळे गटाचे बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच पुढील प्रमाणे – माहेगाव देशमुख-भास्करराव किसनराव काळे, कोळपेवाडी-आण्णा रखमा कोळपे, भोजडे-वाल्मिक शंकर सिनगर, सडे-अनिल गणपत बारहाते, रांजणगाव देशमुख- त्रिंबक रामभाऊ वर्पे, वडगाव-प्रवीण सुखदेव कांगणे, मोर्विस-पंडित पोपट पगारे, शहापूर-सागर किसन घारे हे ८ उपसरपंच आ. आशुतोष काळे गटाचे निवडून आले आहेत.

या सर्व उपसरपंचांचे माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आ. आशुतोष काळे यांनी मागील तीन वर्षात मतदार संघात केलेल्या विकासाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावाच्या विकासासाठी सर्वाना सोबत घेवून गावाचा सर्वांगीण विकास करू. विकासाच्या ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करू.

आमदार काळे यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून उपसरपंचपदाची संधी दिली. त्या संधीचे सोने करून टाकलेला विश्वास सार्थ ठरवू अशा प्रतिक्रिया सर्व उपसरपंचांनी आपल्या निवडीबद्दल व्यक्त केल्या. या निवडीच्या वेळी आ. आशुतोष काळे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळे गटाच्या ८ उपसरपंचांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.