दहा वीज उपकेंद्राच्या पाठपुराव्याला यश – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील वारी, दहेगांव बोलका, रवंदे, कोळपेवाडी, चासनळी, कुंभारी, येसगाव, करंजी, संवत्सर आणि तळेगावमळे या दहा वीज उपकेंद्रातील शेतक-यांना पुर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या वीज वितरण प्रणाली (आर.डी.एस.एस) योजनेत पाठपुरावा करण्यात आला असुन ही कामे लवकरच निवीदास्तरावर सध्या कार्यरत असल्याची माहिती भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील वीजेच्या प्रलंबित समस्याबाबत गेल्या पाच वर्षात एक कृतीबध्द आराखडा तयार करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यास्तरावर सदर दहा वीज उपकेंद्रातील वीजेच्या समस्या कमी होवुन शेतक-यांना पुर्ण दाबाने वीज मिळावी म्हणून मागणी होती.

त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सर्व मंत्रीमंडळाने वीज वितरण प्रणाली संदर्भात राज्यासाठी आर.डी.एस.एस. योजना तयार केली त्याबाबत संजीवनी कार्यस्थळावर बिपीन कोल्हे यांनी सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, नाशिक वीज मंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, संगमनेरचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात व कोपरगाव वीज वितरण कंपनीचे सर्व अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत नियोजन केले.

त्याचप्रमाणे आपेगाव येथे नविन वीज फिडर बसविण्यात येवुन १६ गावांसाठी गावठाण वीज वितरणाबाबत काम हाती घेवुन येसगाव खिर्डीगणेश वीजेचा अतिरिक्त दाब नाटेगाव उपकेंद्रावर, रवंदे मधुन धामोरी, चासनळीतून बक्तरपुर, दहेगाव बोलकातुन कासली वीजभार स्वतंत्र करून येथील शेतक-यांसह वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा कसा होईल याबाबतही चर्चा करण्यात येवुन त्याबाबत उपकार्यकारी अभियंता राठोड यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

देशात आणि राज्यात एकच सत्ता असल्याने वीज समस्यांचे प्रश्न मार्गी लागून त्यासाठी पुर्ण क्षमतेने निधी मिळेल त्याचबरोबर पुढच्या दहा वर्षासाठी वाढत्या नागरीकीकरण व औद्योगिकीकरणासाठी करावयाच्या उपाय योजनाबाबतही आराखडा तयार व्हावा अशी अपेक्षा स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केली.