पावसाचे पाणी दुकानात घुसल्याने व्यावसायिकाचे लाखोंचे नुकसान

  शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : काल मंगळवारी (दि २०) रात्री शेवगाव शहर सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. यावेळी  नगरपरिषदेने मान्सूनपूर्व नालेसफाई केली नसल्याने उघडया गटारीत गाळ व विविध स्वरूपाचा कचरा, प्लॅस्टिक अडकल्याने त्या ओव्हर फूल होऊन उचंबळणाऱ्या पाण्याने वाट मिळेल तिकडे धाव घेतली. अनेक व्यावसायिकाच्या दुकानात, कृषी सेवा केंद्राच्या गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने माल भिजून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील जगदीश धूत यांच्या माऊली कृषी सेवा केंद्राच्या गोदामात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. गोदामातील विविध खताच्या गोण्याच्या थप्या मध्ये, पावडर फॉर्म मधील औषधांच्या खोक्यात पाणी घुसले. यावेळी ४५ किलोच्या युरियाच्या जवळपास १०० गोण्या, ५० किलोच्या २०.२०.० च्या ७० गोण्या, सुक्ष्म अन्न द्रव्य असलेल्या १० किलोच्या ९० गोण्या, जय  किसान कंपनीचे २/४D च्या २० किलो वजनाच्या २० पेट्या, शंभर ग्रॅमच्या प्रत्येकी ५० नग असलेल्या ५० पेट्या Banzy पावडर, शंभर ग्रॅम पॅकिंगच्या फोकस  तननाशकाच्या ४० पेट्या ही पावडरच्या स्वरूपातील औषधे पाण्याखाली राहिल्याने खराब झाली. कृषी सेवा केंद्राच्या कागदपत्राच्या फाईली देखील पाण्यात खराब झाल्याने जवळपास २५ लाखाचे नुकसान झाले.

       सामाजिक कार्यकर्ते असलेले  माऊली कृषी सेवा केंद्र चालक जगदीश धूत  तालुका संघ चालक  असून सामाजिक उदबोधनाच्या  हेतूने अनेक उपक्रम राबवित असतात. नुकतेच त्यांनी  श्रीमद्भगवद्गीतेच्या पाचशे प्रती ग्राहकांना वितरित करण्यासाठी आणल्या होत्या त्यातील दोनशे प्रति सुद्धा गाळ मिश्रीत पाण्यात खराब झाल्या आहेत. 

पावसाळ्या पूर्वी दरवर्षी नगरपरिषदेमार्फत संपूर्ण गटारी जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या साह्याने स्वच्छ करण्यात येतात. परंतु यावेळी गटारी संपूर्णपणे स्वच्छ केल्या गेल्या नाहीत. त्यामधील गबाळ, कचरा, प्रॅस्टिक न काढल्यामुळे त्या तुंबल्या व पाऊस झाल्यावर संपूर्ण पाणी गटारी मधून न वाहता रस्त्यावरून वाहू लागले. हे पाणी दुकानात घुसले यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.