दोनच दमदार पावसाने नाशिकच्या धरणांनी पाणीच पाणी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने घाटमाथ्यावरील धरणांमध्ये पाण्याची आवक कमालाची घटल्याने नाशिक परिसरातील धरणावर विसंबून असलेल्या मराठवाड्यासह, नगर – नाशिक जिल्ह्यातील नागरीकांची चिंता वाढली होती अखेर गेल्या तीन दिवसापासुन नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने नाशिकची बहुतांश धरणं तुडुंब भरली आहेत.
घाटमाथ्यावर पाडणाऱ्या पावसाने दारणा धरण ९६.६८ टक्के भरले आहे, तर बहुतांश धरणे ही शंभर टक्के भरली आहेत. १ जुन २०२४ पासुन ते आज पर्यंत एकट्या गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात तब्बल २० टीएमसी पाणी वाहुन गेले आहे. जायकवाडी धरणाचा साठा मोठा असल्याने शक्य तितक्या लवकर जायकवाडी भरण्यासाठी पाटबंधारे विभाग प्रयत्न करीत आहे हे यावरून सिद्ध होते. गेल्या तीन दिवसांपासून सर्वञ समाधानकारक पाऊस पडत असल्याने सध्या पाण्याची मागणी कमी झाली असली तरीही सर्व धरणामध्ये मुबलक पाणी साठा व्हावा ही आशा सर्वजण बाळगून आहेत.
नाशिकच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. गोदावरी नदी पुन्हा दुथडी भरून प्रवाहीत झाली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपाञात आज ५२ हजार ३०८ क्यूसेक्स वेगाने पाणी जायकवाडीत धरणाच्या दिशेने गोदावरी नदीपाञातुन झेपावत आहे.
गोदावरी खोऱ्यातील धरणांचा सध्याचा पाणी साठा पुढील प्रमाणे दारणा – ९६.६८ टक्के,वाकी- ८९.९३ टक्के, मुकणे – ७०.०९ टक्के, गंगापूर – ९१.५८ टक्के, कश्यपी – ७६.०८ टक्के , कडवा – ८६.०२ टक्के, पालखेड – ८९.७४ टक्के, ओझरखेड – ८०.६१ टक्के भरले आहेत. तर भाम, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, वाघाडी, तिसगाव, हरणबारी आदी धरणे दोन दमदार पावसाने शंभर टक्के भरली आहेत.
सध्या दारणा धरणातून १४ हजार ४१६ क्युसेक्स, गंगापूर धरणातून ८ हजार ४२८ क्युसेक्स,कडवा धरणातून ५ हजार ६२६ क्युसेक्स व इतर धरणातील पाण्याचा विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात करण्यात आला असुन नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून सायंकाळी उशिरापर्यंत ५२ हजार ३०८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपाञात करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे.
धरण परिसरात पडणाऱ्या पावसाने चालु वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आजुन पावसाळा सुरू आहे वाढीव पावसाच्या पाण्याने जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यात दाट आहे. सध्या जायकवाडी धरण ५० भरले आहे.