वज्र निर्धार मेळाव्यातून हर्षदा काकडे यांनी फुंकले रणशिंग
शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,” या पलीकडे राजकारणाचा विषय गेला आहे. त्यामुळे राजकारण या विषयावर भाष्य करणार नाही. मात्र मतदारांनी जागरुक रहायलाला हवे. एकीत अधिक बळ असते, म्हणून सर्वानी एकत्र रहावे असे अवाहन प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे व्यक्त केले आहे.
जनशक्ती विकास आघाडी आजोजित, खंडोबामाळ येथे, गुरुवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ‘जिंकुनी आणिले पाणी’ या फिल्मचे अनावरण व “पाऊले सामर्थ्याची ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच तालुक्यातील ताजनापुर टप्पा क्रमांक २ च्या लढ्यातील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, सरपंच वैभव पुरनाळे, पृथ्वीसिंह काकडे, विनोद मोहिते, सचिन आधाट, बबन माने, नारायण महाराज गर्जे, रावसाहेब मडके, पवन साळवे, गोरक्ष कर्डिले, विनायक देशमुख, अल्ताफ शेख, बाळासाहेब कचरे, लक्ष्मण गवळी, माणिक गर्जे, राम साळवे, आदी उपस्थित होते.
अनासपुरे म्हणाले, तीन दशकांपासून काकडे दाम्पत्य पाणी प्रश्नावर लढत आहे. निसर्गाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा लढा महत्त्वाचा आहे. चांगले काम करणाऱ्यांवर टीका होते. गोड फळाच्या झाडालाच लोक दगड मारत असतात. मतदारांनी पैश्याची नाही तर मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.
हर्षदा काकडे म्हणाल्या, जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने विकासाची कामे केली. वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या साखर सम्राट कारखानदारांनी तालुक्यासाठी काय केले असा सवाल उपस्थित करुन त्यांनाही हवे असणारे परिवर्तन आम्हाला नको. त्यांना हवे असणारे परिवर्तन म्हणजे आमच्याच घरातील नव्या उमेदवारास संधी द्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समिती सभापती पद असूनही त्यांना विकास साधता आला नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी या लोकांनी समाजात, जातीपाती मध्ये भांडणे लावली, त्यामुळे दंगल घडली. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. त्यांना अध्यक्षपदाच्या वेळी पाठिंबा दिल्याचा आज पश्चाताप होतो.
त्यांनी अडीच वर्षात कवेळ आपलाच विकास साधला. या काळात बिगर टक्केवारी शिवाय एकही काम झाले नाही. कोणाचाही नामोल्लेख न करता विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांना जनहित कळतं नाही, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असे सांगून आता काहीही झाले तरी थांबायचे नाही, शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पाणी आणण्यासाठी निवडणूक लढण्याचा वज्र निर्धार यावेळी हर्षदा काकडे यांनी केला.
ॲड. काकडे म्हणाले, आलटून पालटून तीनही घरण्यांना मतदारांनी सत्ता दिली, साखर कारखाने दिले. मात्र त्यांनी जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले. जनतेने ठरवले तर भल्याभल्याची जनता जिरवते, यापूर्वी तुकाराम गडाखाचे नावही माहित नसताना तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही हे सिध्द झाले आहे. याची पुनरावृत्ती तालुक्यात घडणार आहे.
तालुक्यातील जनतेचा त्याग लक्षात आणून देत, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे एमआयडीसी संदर्भात मागणी केली. त्यांनीही तत्काळ दखल घेऊन बैठका घेतल्या, मात्र, मंजुरीच्या वेळी विद्यमान आमदार, खासदारांनी या प्रश्नात खोडा घालून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या स्वप्न धुळीस मिळवल्याचे काकडे यांनी सांगितले. भाऊसाहेब सातपुते यांनी प्रास्ताविक केले. पृथ्वीसिंह काकडे यांनी आभार मानले.