विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : मागील दोन वर्षानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून एस. टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील कोरोनापूर्व परिस्थितीपूर्वी असलेल्या संख्येच्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे एस. टी. ची सेवा सुरळीत करून विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बसस्थानक आगारप्रमुख अभिजित चौधरी यांना दिल्या आहेत.

कोपरगाव आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण भागातील विविध गावांच्या ठिकाणी कोपरगाव आगाराच्या बस जात असतात. मात्र मागील दोन वर्ष वैश्विक कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे एस. टी. ची सेवा विस्कळीत झाली होती.परंतु काही महिन्यांपासून कोरोना रुग्णाची संख्या कमालीची घटली जावून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे साहजिकच एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील पूर्वपदावर आली आहे. त्याचा प्रत्यय दिवाळीच्या सुट्टीत एस. टी. प्रवासाला प्रवाशांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसून आला आहे.

नुकतीच दिवाळीची सुट्टी संपली असून सर्व शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्याचबरोबर लग्नसराई  देखील सुरु झाली असल्यामुळे एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या व शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. तसेच एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये महिला, अपंग व जेष्ठ नागरिकांची संख्या देखील मोठी असते व बहुतांश प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने एस. टी.ने प्रवास करण्यालाच प्राधान्य देतात व असंख्य विद्यार्थ्यांचे शिक्षण देखील याच एस. टी. वर अवलंबून आहे.

मात्र अजूनही काही गावात एस. टी. येत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे आर्थिक नुकसान होत असून सुरीक्षततेचा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी योग्य नियोजन करून एस. टी.ची सेवा कोरोनापूर्व परिस्थितीप्रमाणे पूर्ववत करावी व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी आगारप्रमुख अभिजित चौधरी यांना दिल्या आहेत.