शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : शेवगाव तालुक्यातील सहापैकी पाच मंडळात गेल्या रविवारी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात तालुक्यातील सुमारे पंधरा हजार ६८४ हेक्टर वरील कापूस सोयाबीन तूर, मूग, बाजरी, भाजीपाला आदि पिकांना मोठा फटका बसल्याचा नजर अंदाज अहवाल तालुका कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर पाठविण्यात आला.
याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली असता प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांनी वरील क्षेत्रात झालेले नुकसान हे ३३ टक्याच्या आत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश आमच्याकडे अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेसह राज्याचे कृषिमंत्री कृषी आयुक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कडेनिवेदनाद्वारे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे प्रशासन अतिवृष्टी झाल्याचे मान्य करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्याच्या आत असल्याने पुढील कार्यवाही करता येत नसल्याचे सांगून तालुका कृषी विभाग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्नात आहे. तेव्हा आपण जातीने लक्ष घालून अतिवृष्टीची आकडेवारी पाहून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागासह सर्व संबंधितांना देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील शेवगाव मंडळात रविवारी १०२.१ मिलिमीटर भातकुडगाव ८०.१ बोधेगाव ९२.८ चापडगाव ११८. ८. ढोरजळगाव ८१.३ मी मी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हे नमुद करून गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात दररोज कधी मध्यम तर कधी जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेली पिके अडचणीत सापडली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.