सेवेतून जीवनाला पूर्णत्व प्राप्त होत – बाळासाहेब कोळेकर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : उदरनिर्वाहासाठी निवडलेल्या क्षेत्रात कोणत्याही गोष्टींची कमी न बाळगता दिलेल्या सेवेतून जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते असे गौरोदगार अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी येथील संकल्पना फाउंडेशनच्या सेवा गौरव पुरस्कार वितरण समारंभात बोलताना काढले. गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या प्रत्येकाचा सेवा भाव आपण जपला पाहिजे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

अंधत्वावर मात करत आनंदराव आढाव यांनी केलीली संगीत सेवा, व्यवसायाला माणुसकीची जोड देवून डॉ.दत्तात्रय मुळे यांनी दिलेली वैद्यकीय सेवा आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतांना देशसेवेचे धडे देणारे प्रा.डॉ.शैलेन्द्र बनसोडे यांचे सेवा कार्य हे कोपरगांव तालुक्यातील युवा पिढीला दिशादर्शक आहे असेही ते म्हणाले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात जेष्ठ संगीत शिक्षक आनंदराव आढाव, डॉ.दत्तात्रय मुळे व प्रा.डॉ.शैलेंद्र बनसोडे यांना सेवा गौरव पुरस्कार देवून
गौरविण्यात आले. कोपरगांव तालुक्याच्या संगीत, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तीनही मान्यवरांचा योग्य वेळी होणाऱ्या सन्मानाने सेवा गौरवाची उंची वाढली असे मत राजेश परजणे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

बालवयात आनंदराव आढाव यांची शिस्त दिशादर्शक ठरली आणि प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता डॉ. मुळे व प्रा. डॉ.शैलेंद्र यांनी दिलेली सेवा खऱ्या अर्थाने आदर्श आहे तसेच संकल्पना फाउंडेशन चे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे कोपरगांव तालुक्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत मैलाचा दगड ठरेल असे मत काका कोयटे यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मयुर तिरमखे, कांतीलालअग्रवाल, माधवराव देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर.बजाज, व्यापारी महासंघाचे सुधीर
डागा, योगेश जोबनपुत्रा, डॉ.गुंजाळ, अश्विनकुमार व्यास, अॅड अशोक बनसोडे, डॉ.शिरीष व संकेत मुळे, रोटरी क्लब चे अध्यक्ष व सचिव राकेश
काले, विशाल आढाव आदि उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन गवळी, डॉ.आस्था तिरमखे, डॉ.किरण लद्दे, सुमित खरात, कैलास नाईक, प्रवीण शेलार, प्रसाद सोनवणे, प्रथमेश पिंगळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव गणेश सपकाळ यांनी तर प्रा. तुकाराम दरांगे यांनी सूत्रसंचालन केले.