संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला जनरल चॅम्पिअनशिप  

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे विविध कलेत पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संगमनेर येथे आयोजीत केलेल्या जिल्हा स्तरीय युवक महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांमधील  सर्वात जास्त बक्षिसे जिंकुन ‘ जनरल  चॅम्पिअनशिप ‘  चा बहुमान पटकावुन अहमदनगर जिल्ह्यातील  या महोत्सवात सहभागी झालेल्या ५१ महाविद्यालयांमध्ये अव्वल असल्याचे सिध्द केले, अशी  माहिती संजीवनी महाविद्यालयाच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

या युवक महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अखत्यारीतील अहमदनगर जिल्ह्यातून ५१  महाविद्यालयाच्या सुमारे १२०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.संजीवनीच्या कलाकार विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, नकला, रांगोळी, वादविवाद, प्रश्नमंजुषा , लोकनृत्य, पाश्चिमात्य  गायन व वादन, शास्त्रीय वादन, अशा  विविध स्पर्धामध्ये भाग घेवुन सर्वात जास्त स्पर्धा जिंकत जनरल चॅम्पियनशिपचा  बहुमान पटकाविला.

वास्तविक इंजिनिअरींग कॉलेज मधिल विद्यार्थ्यांचा कल तांत्रिकबाबी आत्मसात करण्याकडे असतो. मात्र संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तांत्रिक बाबींबरोबरच प्रत्येक क्षेत्रातीत प्रशिक्षण  दिल्या जाते. त्यामुळेच स्पर्धा कोणतीही असली तरी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज त्या जिंकणारच, हे समिकरण बहुतांशी  सत्यात उतरत आहे.

‘स्टुडन्टस्  अॅक्टिीव्हिटीज’ विभागाचे डीन डॉ. मकरंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व विजयी विद्यार्थी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पातळीवरील आपापल्या स्पर्धेत भाग घेणार आहे. यात अहमदनगरसह पुणे व नाशिक जिल्ह्यातील  स्पर्धक सहभागी असणार आहे. तेथेही जिंकायचेच , या जिध्दीने सर्व स्पर्धक सराव करीत आहेत. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले व त्यांना विद्यापीठ पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर व डॉ. कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.