कोळपेवाडी, चासनळी, पोहेगाव १३२ के.व्ही उपकेंद्र पूर्ण – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव, चासनळी येथे असलेल्या विद्युत उपकेंद्रावर विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे पोहेगाव, सुरेगाव, चासनळी, कारवाडी, मंजूर, हंडेवाडी आदी भागातील घरगुती वीज ग्राहकांना आणि कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात सतत अडचणी येत होत्या, विजेची समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. 

तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शहा वीज उपकेंद्राचा पाठपुरावा केला. याकामी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी शहा (ता. सिन्नर) येथे १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्रासाठी जवळपास १६ एकर जागा उपलब्ध करून दिल्याने, हे उपकेंद्र नुकतेच कार्यान्वितदेखील झाले आहे. त्यामुळे पोहेगाव, सुरेगाव, चासनळी विद्युत उपकेंद्र जोडून  कारवाडी, मंजूर, हंडेवाडीसह पोहेगाव, सुरेगाव, चासनळी आदी अनेक गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.  या परिसरातील शेतकरी तसेच वीज ग्राहकांनी स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले.