मृत्यूनंतर जिल्हापरिषदेच्या शिक्षिकेला बदलीचे आदेश

शिक्षण विभागाचा प्रताप

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७: तालुक्यातील दहिफळ येथील जिल्हापरिषद उर्दू माध्यमाच्या शाळेतील एका शिक्षकेचा डिसेंबर महिन्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या बदलीचा आदेश आज जिल्हापरिषद शिक्षण विभागाच्या ऑनलाईनद्वारे निघाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  ‌ शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील उर्दू शाळेवरील शिक्षिका शेख अफसाना शबीर रा. झेंडीगेट, नगर यांचे १२ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधन होऊन पावणेदोन महिने उलटल्या नंतर काल दि. ६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या बदलीचे आदेश शेवगाव इथून जामखेड येथे निघाले. याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

      शिक्षण विभागाच्या बदली पोर्टलमुळे शिक्षकांच्या बदल्याबाबत अनेक मजेशीर किस्से घडत आहेत. यात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या बदल्या तर झाल्याच आहेत. पण त्यावर कडी म्हणजे पावणेदोन महिन्यापूर्वी मृत्यू पावलेल्या या शिक्षिकेची बदली करण्याचा प्रताप या बदली पोर्टलच्या संगणक प्रणालीकडून घडला असल्याचे समजते.

संगणक प्रणाली द्वारे या बदल्या ऑनलाईन झाल्या आहेत. मात्र ऑनलाइन प्रणालीला अपडेट माहिती भरणे आवश्यक असताना ती वेळच्या वेळी न भरल्यामुळे हे घोटाळे झाले आहेत. ती जबाबदारी कोणाची हा प्रश्न उरतोच.