क्रीडा स्पर्धासाठी कार्य करणाऱ्या पंचांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी                

१५० रुपये मानधनात जेवण, नाष्टा, प्रवास कसा करावा ?

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : अहमदनगर शहर व जिल्हा स्तरावर प्रतिवर्षी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते या क्रीडा स्पर्धेसाठी शालेय स्तरावरून तसेच शासनाकडून निधीची व्यवस्था करण्यात आलेली असते. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिवर्षी क्रीडा शिक्षक तसेच एकविध क्रीडा संघटनांसह अनेकांचे सहकार्य लाभत असते. या स्पर्धा विना तक्रार योग्य नियमाचे अधीन राहून पार पाडण्याची जबाबदारी पंचांवर सोपवलेली असते. 

पंच आपआपल्या खेळात तज्ञ असुन खेळावर नितांत प्रेम करणारे, विविध क्षेत्रात काम करणारे असून खेळासाठी रजा काढून दिवसभर मैदानावर पंचाचे कार्य करतात. मैदानावर कार्य केल्यानंतर त्यांना आपले जिल्ह्यात केवळ दीडशे रुपये (१५०) मानधन दिले जाते. अशाच कार्यात सहभागी पंचांना इतर जिल्ह्यात पाचशे रुपये (५००) मानधन देण्याची तरतूद आहे ते दिले जाते आजच्या महागाईच्या काळात १०ते१२ तास काम केल्यानंतर मिळणारे १५० रुपयाचे मानधन अत्यंत अल्प आहे.

दिवसभरासाठी चहा, नाश्ता, भोजन व प्रवासभाडे याचा विचार करता दीडशे रुपये (१५०) मानधन ही अत्यंत अल्प असल्याने पाचशे रुपये (५००) मानधन प्राप्त करून देण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, कार्याध्यक्ष प्रा.संजय साठे, सरचिटणीस मकरंद को-हाळकर, कोषाध्यक्ष नंदू अष्टेकर, सचिव कल्पेश भागवत, शैलेश गवळी, प्रवीण गीते, दत्ता देवकर, प्रा.संजय साठे आदीसह खेळाडू मोठ्या उपस्थित होते. यावेळी वाडिया पार्क येथे महिला खेळाडूंना चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.           

शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा सुरू असतांना वाडिया पार्क येथे महिला खेळाडू व विद्यार्थिनी हे मोठ्या संख्येने  मैदानावर खेळण्यासाठी येत असतात त्यांना चेंजिंग रूम उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात यावी तेथे महिलांसाठी चेंजिंग रूम फलक लावण्यात यावा. तसेच एकविध खेळाच्या संघटनांना कार्यालयासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना निवेदन देवुन करण्यात आली.

    तसेच शालेय स्पर्धांचे आयोजन सुरळीत व्हावे म्हणून अग्रिम निधी दयावा. त्याच प्रमाणे २०२२-२३ चे तालुका प्राविण्य प्रमाणपत्र छापील स्वरूपात देण्यात यावे. २०२२-२३ चे खर्चाचे अनुदान व सन २०२२-२३ च्या स्पर्धा आयोजनाची खर्चाची बिले तात्काळ अदा करावी असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. 

शालेय अनुदानातून क्रीडा संलग्नता फी व प्रवेश फी भरण्याबाबत समन्वय साधावा. स्पर्धेसाठी पंचांना शाळेतून सोडण्याबाबत योग्य सूचना दयाव्या. या निवेदनाच्या प्रति मा. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना देण्यात आल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी भागश्री बिले यांनी संघटनेशी सविस्तर चर्चा केली व सकारात्मकता  दाखवुन निवेदनातील  मागण्या  मान्य करीत लवकरच क्रीडा शिक्षक व खेळ संघटनेच्या मदतीने स्पर्धा यशस्वी करण्याचे स्पष्ट  केले.