शेतकर्‍यांच्या न्यायासाठी भिसे यांचा आत्मक्लेष आंदोलनाचा निर्धार

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या गारपिटीचे पंचनामे करताना कृषी खात्याने तालुक्यातील सामनगाव व मळेगाव या दोन गावांना सापत्न वागणूक दिली. या अस्मानी संकटामुळे नागवल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा सनदशीर मार्गाने संबंधितासमोर मांडूनही पंचनामे झाले नाहीत. पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळालाच नाही. उलट मागणीबद्दल टिंगल टवाळीची भाषा वापरली गेली. 

लोक प्रतिनिधीच्या समोरासमोर तीन चारशेच्या उपस्थितीत ती सांगून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भीक मागितली, तरीही उपयोग न झाल्याने भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते, तब्बल पंधरा वर्षे मळेगावचे सरपंच राहिलेल्या शिवाजीराव भिसे यांनी मनस्वी खेद व्यक्त करत आत्मक्लेष आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मात्र त्या अगोदर आपलेच शासन असल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्याकडे याबाबत मनमोकळे करून मगच आंदोलन करण्याचा मनोदय व्यक्त केल्याने, येथील कृषी खात्याचा भोंगळ कारभार व त्यास पाठीशी घालणाऱ्या प्रशासन व शासनाच्या प्रवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्याना भिसे यांनी सविस्तर माहिती कळविली आहे. गेल्या ७ व ९ एप्रिलला तालुक्यात वादळ वाऱ्यासह गारपीट होऊन गहू, बाजरी, कांदा पिकाचे व फळ बागाचे मोठे नुकसान झाले. लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखवत दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पहाणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. मात्र प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांनी सामनगाव व मळेगाव या दोन पिडीत गावाचे पंचनामे केलेच नाहीत. यासाठी भिसे यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सर्वांचे उंबरे झिजवले.

विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांनाही समक्ष भेटून अर्ज विनंती केल्या. मात्र सर्वांनी आतापर्यंत एकमेकाकडे बोट दाखवत टोलवाटोलवी करण्यापलीकडे काहीही केले नाही. खरीप आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी समोर तालुका कृषी अधिकारी यांची तक्रार केली. तुमचा पंचनामा झालाय ना ? बाकीच्यांची पंचायत कशासाठी करता. लोकांना काय सरकारच्या फुकटच्या पैशाची सवय लागली आहे. अशा अत्यंत अशोभनीय भाषेत उत्तर दिले. त्याचाही पाढा सर्वासमोर वाचून झाला होता.

मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यासंदर्भात कठोर निर्णय घेण्यास असमर्थ आहेत का ? शेकडो शेतकर्‍यांचे आश्रू पुसण्यापेक्षा या झारीतील शुक्राचार्यास जपणे त्यांच्या लेखी अधिक महत्वाचे आहे काय? या विचाराअंती आपण शेवटी आत्मक्लेष करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना अंतर्मनाला वेदना होत आहेत.

शासन आपले असूनही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जात नाहीत. मात्र त्या अगोदर एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंढे, यांना भेटून मनमोकळे करायचे आणि शेवटचा उपाय म्हणून त्यांनाही दोन दिवसाची मुदत द्यायची आणि मग आपण कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास मोकळे राहू. असेही भिसे यांनी शेवटी नम्रपणे नमुद केले आहे.