वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीला द्यावेत- स्नेहललता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात भारनियमन सुरू असल्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे हे भारनियमन ताबडतोब रद्द करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहललता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तसेच पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली असून, गोदावरी कालव्यांना सध्या सुरू असलेल्या बिगरसिंचनाच्या आवर्तनातून खरीप पिकांना सिंचनासाठी त्वरित पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशीही मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून भारनियमन (लोडशेडिंग) केले जात आहे. या लोडशेडिंगमुळे ग्रामीण भागात विजेची समस्या निर्माण झाली आहे.

भारनियमनाच्या नावाखाली ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने, जनजीवन विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचेही प्रश्न निर्माण झाले आहेत. लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही.

पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग आदी पिकांची लागवड केली. पुढे पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु पावसाने पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. बहुतांश ठिकाणी शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यातच महावितरण कंपनीने लोडशेडिंग सुरू केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

जेमतेम पावसावर शेतात उगवण झालेली पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी उपलब्ध आहे, त्यांना लोडशेडिंगमुळे विहिरीतून पाणी उपसा करून पिकांना देता येत नाही. पिकांना पाणी देण्यासाठी वीज नसल्याने, पिके धोक्यात आली आहेत. तसेच विद्युत वाहिन्यांमध्ये नेहमी बिघाड होऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे कृषिपंप नीट चालत नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

पाण्याअभावी पिके डोळ्यांदेखत वाळून जात असल्याने शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यामुळे लोडशेडिंग त्वरित रद्द करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी स्नेहललता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातील पाटपाण्याच्या प्रश्नाकडेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. कोपरगाव तालुका हा अवर्षणप्रवण तालुका असून, या मतदारसंघात दारणा धरणातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे मिळणाऱ्या पाण्यावरच या भागातील शेतकरी पिके घेतात. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या तुटपुंज्या पावसावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; पण पेरणीनंतर दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे.

पावसाअभावी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात उगवलेली पिके जगवण्यासाठी सध्या पाण्याची खूप गरज आहे. नाशिक जिल्ह्यात दारणा व इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांतून बिगरसिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.

या बिगरसिंचनाच्या आवर्तनातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे, जेणेकरून पावसाअभावी वाळत चाललेल्या खरीप पिकांना जीवदान मिळू शकेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला द्यावेत, अशी मागणी स्नेहललता कोल्हे यांनी केली आहे.