पाझर तलाव भरण्यासाठी नद्या, ओढे व नाले जोडा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी,दि. ०१ : कोपरगाव मतदार संघातील मौजे वेस येथील बंधाऱ्यातून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याकरिता धोंडेवाडी, जवळके, शहापूर व बहादराबाद या गावांचे पाझर तलाव भरणेसाठी या गावातील छोट्या नद्या व ओढे नाले एकमेकांना जोडा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्याकडे दिलेल्या पत्रात केली आहे.

कोपरगाव मतदार संघात चालू वर्षी अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचे देखील मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार असून मोठा आर्थिक खर्च देखील होणार आहे. भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी नागरिकांना पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होवून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.

त्यासाठी जलसंधारण विभाग किंवा मुख्यमंत्री जलयुक्त शिवार योजने अंतर्गत वेस येथील बंधाऱ्यातून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याकरिता धोंडेवाडी, जवळके, शहापूर व बहादराबाद या गावांचे पाझर तलाव भरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न काही अंशी सोडविण्यास मदत होणार आहे. या भागातील छोट्या नद्या व ओढे-नाले एकमेकांना जोडण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. त्याबाबत सबंधित विभागास लवकरात लवकर आदेश द्यावेत अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना दिलेल्या पत्रात केली आहे