कोपरगावातील कल्पतरू हाॅटेलवर पोलिसांची धाड

कुंटणखाना चालवणारा विजय मवाळ पोलिसांच्या ताब्यात

कोपरगाव प्रतिनिधी दि.१२ : कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गाच्या लगत येवला रोड परिसरातील हाॅटेल कल्पतरू येथे गेल्या अनेक दिवसांपासून कुंटणखाना चालवणारा विजय सोपानराव मवाळ वय ५९ वर्षे याच्यासह दोन युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, येवला रोड परिसरातील हाॅटेल कल्पतरू येथे कुंटणखाना सुरु असल्याची गुप्त माहिती नव्याने रुजू झालेले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना मिळाली त्यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनेची माहिती देताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी शुक्रवारी राञी आठ वाजण्याच्या दरम्यान बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाना चालु असल्याची खाञी करुन आपल्या पोलीस पथकासह घटना स्थळी जावून धाड टाकली.

हाॅटेल मधील चार खोल्या तपासल्या त्यातील दोन खोल्यामध्ये दोन युवती वेश्या व्यवसाय करीत असल्याचे तसेच संबंधित युवतीला वेश्या व्यवसाय करण्यास जागा उपलब्ध करून देवून कुंटणखाना चालवणारा विजय मवाळ मिळून आला. पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता. तेथे निरोधाचे पाकिटे व रोख रक्कम आढळून आली.

पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवून कुंटणखाना चालवणारा विजय मवाळला ताब्यात घेतले. तसेच तीन मोबाईलसह ४० हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कर्मचारी सुनंदा संजय दराडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये विजय मवाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे, नाशिक सीआयडी मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे  त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. देशमुख रूजू झाल्याबरोबर धडाकेबाज कारवाई करुन अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे. 

शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्या बरोबर चोरून लपून हाॅटेलमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस निरीक्षक देशमुख यांची करडी नजर राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. 

एकेकाळी कोपरगाव म्हणजे कुंटणखान्याचे गाव अशी ओळख सर्वदूर होती ती ओळख पोलीस, महसुल अधिकारी व राजकीय नेत्यांच्या सहमतीने कायमची पुसुन काढली. आता कुठे तरी कोपरगावचे नाव शैक्षणिक क्षेञासह विविध माध्यमांतून उंचावत आहे. माञ काही विकृत प्रवृतीचे लोक पुन्हा कोपरगाव शहरात कुंटणखाना चालवून स्वार्थापोटी तरुणाईला बरबाद करीत आहे. तसेच कोपरगावची बदनामी करीत आहेत. हे या कुंटणखान्यावरून दिसते.