नितीन काकडे कृषीभूषण पुरस्काराने सन्मान

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : तालुक्यातील बोधेगावचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, गोपालक नितीन काकडे यांना पुणे येथील वृंदावन फाउंडेशन व राजमुद्रा संशोधन व विकास केंद्राच्या वतीने पशुपालन संवर्धनातील व गोसंवर्धनातील विशेष योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथे पार, पाडलेल्या या सोहळ्यात त्यांच्या मातोश्री श्रीमती माई व बहिण निता यांचे समवेत काकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सिंगणापूरकर यांच्या हस्ते व शिवाजी महाराज मोरे, देहूकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

काकडे यांचेकडे शंभरावर जातीवंत गावरान गायींचा मुक्त गोठा आहे. गो संगोपणातून त्यांनी दुग्ध व्यवसाय आणि शेतीच्या आरोग्यासाठी शेणखताचा प्रचार व प्रसार केला आहे. माई नावाने शेतात गोशाळा उभारून गो संरक्षण आणि गोसंवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावल्याने काकडे यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.