कोल्हेंना थेट दिल्लीचं बोलावण, कोपरगावच्या राजकारणाकडे राज्याच लक्ष   

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगावचं राजकारण म्हणजे काळे- कोल्हे यांची पारंपारिक राजकीय जोडी सर्वश्रुत आहे.  या विधानसभा निवडणुकीचं चिञ जरा वेगळ्या वळणावर जात असल्याने काळे पेक्षा कोल्हेंची चर्चा सध्यातरी जोरदार सुरु आहे.

आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच युवा नेते विवेक कोल्हे हे सध्यातरी महायुतीत अर्थात एकाच गटात असल्याने २०२४ ची विधानसभा कोण कोणत्या पक्षातून लढणार याकडे लक्ष लागलेले असताना अचानक कोल्हे यांच्या भूमिकेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

कोल्हे परिवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर किंवा उध्दव ठाकरेंच्या सेनेत जावून विधानसभेची निवडणुक लढवणार अशी चर्चा जोरदार रंगली असताना कोल्हे परिवाराने भाजप पासुन दुर न जाण्याची तयारी दर्शवत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. कोल्हे परिवार जर भाजप पासुन दूर गेला तर भाजपसह महायुतीच्या अनेक उमेदवारांना त्याचा मोठा फटका बसु शकतो.

शेजारच्या तालुक्यासह जिल्ह्यांमध्ये कोल्हे यांचा जनसंपर्क मोठा आहे. कोल्हे यांना मानणारा वर्ग नगरसह नाशिक, जळगाव, धुळे, पुणे सह अनेक जिल्ह्यात आहे. जर कोल्हे भाजप पासुन दूर गेले तर भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत काही ठिकाणी मताधिक्य घटुन उमेदवारांवर परिणाम होतील या भितीपोटी उपमुख्यमंञी  देवेंद्र फडणवीस हे कोल्हे यांना भाजप पासुन दूर  जाण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच कोल्हे यांच्या राजकीय ताकतीचा अंदाज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आला असल्याने लोकसभेतील निवडणुकीत झालेली चुक पुन्हा होवू नये यासाठी केंद्रीय भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह खुद अमित शहा यांनी कोल्हेंना दिल्लीला बोलवून कोल्हेंचे समाधान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आज कोल्हे दिल्लीत गेल्याने कोल्हे यांना केंद्रीय मंञी अमित शहा व खुद्द पंतप्रधान कोणता शब्द देणार की, कोणतं पद देवून मनधरणी करणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या धाडशी निर्णयातुन  कोपरगाव तालुक्याच्या राजकारणात कोणता चमत्कार घडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 दरम्यान संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे एकदा तरी आमदार किंवा खासदार व्हावेत अशी आशा माजी मंञी स्व. शंकरराव कोल्हे यांची होती. शरद पवार यांना अनपेक्षितपणे मुख्यमंञी करणारे स्व. शंकरराव कोल्हे हे आपल्या मुलाला  डोळयादेखत आमदार किंवा खासदार करु शकले नाहीत. स्व. शंकरराव कोल्हे यांची अंतिम इच्छा पुर्ण करण्याचा चंग काही कार्यकर्त्यांनी बांधला आहे. अशातच युवा नेते विवेक कोल्हे यांची नवी राजकीय खेळी थेट केंद्रीय पातळीवर खळबळ उडवून देणारी ठरल्याने कदाचित कोल्हे परिवाराला राज्य सभेवर संधी मिळून खासदारकी मिळू शकते.

  सध्या कोल्हे यांच्या राजकीय  घडामोडींवर मतदार संघातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.  काही कार्यकर्ते कोल्हे यांच्या  निर्णयाक भूमिकेला सहमती दर्शवत आहेत, तर काहींनी थेट विरोध दर्शवत निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्यासाठी गळ घालत आहेत. 

 दुसरीकडे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख कोल्हे यांच्यासाठी आपली दारं उघडी ठेवून कधी ते आपल्याकडे येतील याची प्रतिक्षा करीत आहेत. कोल्हेंना गेल्या दहा वर्षांत भाजपने काहीच दिले नाही. कोणताही लाभ कोल्हेंनी उचलला नाही. अशाही स्थितीत कोल्हेना अनेक ठिकाणी मोठी ऑफर असतानाही ती झुगारुन भाजप बरोबर राहण्याची इच्छा कोल्हे परिवार व्यक्त करीत आहे. म्हणुनच  कोल्हेंनी भाजपला दूर न करता पुन्हा पुन्हा आपलसं करीत दूर गेले नाहीत यावरून कोल्हे भाजपमध्ये राहीले पाहीजेत व त्यांना तितक्याच दर्जाचा सन्मानकरता यावा यासाठी अमित शहा कोणती भूमीका बजावतात याकडे लक्ष लागले आहे. 

 गेल्या आठ दिवसांत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी कोल्हे यांची मनधरणी केल्याने कोल्हे सध्यातरी थांबा वाट पहा आणि सुरक्षित पुढे जा अशा अवस्थेत आहेत. कोल्हेना जर केंद्रीय नेतृत्वाने केंद्रात मोठी जबाबदारी दिली तर कोपरगाव मतदार संघातील राजकीय चिञ वेगळं असणार आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात कोणता उमेदवार तुल्यबळ असेल. कोपरगावच्या निवडणुकीचा रंग काळे कोल्हे मुळे बहरतो.  काळे कोल्हे यांच्यातील खरी लढत यावेळी होईल की नाही हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

काहीही झालं तरी कोपरगावला काळे किंवा कोल्हे यांची जितकी राजकीय ताकत आहे तितकी ताकत इतर कोणाचीही सध्यातरी नाही. सहानुभुतीच्या लाटेवर आमदारकीचं स्वप्न पहाणारे खुप पुढे येत आहेत. पण काळे कोल्हे यांच्या निर्णयावर तालुक्याचं राजकारण चालतं.