रांगोळी व घोषवाक्यातून मतदार जनजागृतीचा उपक्रम

शेवगाव प्रतिनीधी, दि. १७ : शोवगाव पाथर्डी २२२ विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढून  शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती समिती ( स्वीप ) विविध उपक्रम राबवून मतदारांचे प्रबोधन करीत आहे. अनेक शाळांत आकर्षक रांगोळी व घोषवाक्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत पालक मतदारांना येत्या २० तारखेला निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. 

स्वीप समितीच्या नोडल अधिकारी तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश घेवरीकर, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे उपाध्यक्ष रमेश गोरे, प्रा. नितीन मालाणी व मोहमंद वसिम यासाठी प्रयत्नशील आहेत.

शहरातील पद्मभुषण बाळासाहेब भारदे विद्यालयातील सुनिल डाखूरकर तसेच पूर्व भागातील प्राथमिक शिक्षक विनायक सुरवसे यांच्या रांगोळीने मतदार जनजागृती केली आहे. रांगोळी काढताना त्यात घोषवाक्यांची भर टाकल्याने मतदानाविषयी मतदारांत चांगली जनजागृती होत आहे. “चला मतदान करू या,”   ” लोकशाही बळकट करू या ”  तसेच ” मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो,”   ” सर्वानी १०० टक्के मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा ” या सारख्या घोषवाक्यांच्या संदेशाने मतदारांचे चांगलेच प्रबोधन होत आहे.

       निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत सांगडे यांनी या उपक्रमांचे कौतुक करीत शिक्षकांचे व स्वीप समितीचे अभिनंदन केले आहे.