राष्ट्रवादीच्या काळेंना विखेंच बळ, पण भाजपच्या कोल्हेना देतायत झळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : कोपरगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांना भाजपचे नेते, राज्याचे महसूल मंञी तथा नगरचे पालकमंञी राधाकृष्ण विखे यांचा छुपा पाठिंबा आता उघडपणे सुरु झाला. तर भाजपच्या माजी आ. स्नेहलला कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांना छुपा विरोध होता. तो आता उघडपणे होणार असल्याचे चिञ राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता व्यक्त केला आहे. 

यांच्या एकदिवसीय तालुका दौऱ्याने कोपरगाव तालुक्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री विखे यांच्या तालुका दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोपरगावच्या राजकारणावरून विखे कोणती भूमिका मांडणार, कोपरगावच्या राजकारणात कशी ढवळाढवळ करण्यास सुरुवात होणार, अशी चर्चा रंगली होती. माञ, विखे यांनी आपल्या भाषणातून जाहीर पणे सांगितले की, आशुतोष काळे हे महायुतीचे आमदार असल्याने त्यांना ताकद देवून राज्य सरकारच पाठींबा उभं करणे ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे.

आशुतोष काळे यांच्या पाठीमागे शंभर टक्के सर्व ताकतीने मी उभा आहे. कोणाची कशी जिरावा जिरवी करायची ते काम माझ्यावर सोपवा मी सक्षम आहे. कोपरगावकरांनी तळ्यातला गाळ काढला. पण आपल्या तालुक्यात बराच गाळ काढायचा आहे. आता गाळ काढण्याची सुरुवात झाली आहे.  कोपरगावकरांशी संवाद वाढवायला पाहीजे होता. तो राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या निमित्ताने सुरुवात झाली आहे. असे म्हणत विखे यांनी कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत काळेंना बळ, तर कोल्हेंना झळ पोहोचेल अशी भूमिका आपल्या बोलण्यातुन दाखवली.

तसेच युवानेते विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहता तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून काढत असल्याने तोच धागा पकडत विखे म्हणाले की, काही मानवी बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे. देशाला नरेंद्र मोदींची गॅरंटी त्यामुळे लोकांनी चिंता करण्याची गरज नाही. माञ, आपल्यातील काही लोक डळमळीत झाले होते.

दुसऱ्यांच्या नादी लागले आहेत. त्यांचं बोट सोडायला तयार नाहीत. असे म्हणत, गणेश कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे एकञ येवून कारखाना ताब्यात घेतल्यावरून विवेक कोल्हे यांच्यावर विखेंनी निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, ज्यांना तुम्ही खांद्यावर घेवून नाचताय ते ७ वर्षे महसूल मंञी म्हणून मिरवले त्यांना शिर्डी एमआयडीसी मंजूर करावीशी का वाटली नाही?

एमआयडीसीसाठी तुम्ही काहीच प्रयत्न केले नाही. तेव्हा किमान बोलु तरी नका असे म्हणत विखेंनी कोल्हेंचा समाचार घेतला. विखेंच्या एकुण भाषणातुन कोल्हेंना झळ देवून आ. आशुतोष काळे यांना आगामी निवडणुकीत बळ देण्याचे प्रयत्न असल्याची जाणीव करुन दिल्याने तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.