कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : राज्यातील आदिवासी बांधवांच्या उत्कर्षात सातत्यांने नवनविन स्थित्यंतरे घडवुन आणणारे व्यक्तीमत्व म्हणजे माजीमंत्री कै. मधुकरराव पिचड होय, त्यांचे कार्य राज्याला आदर्शवत होते अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करून श्रध्दांजली वाहिली.
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व माजीमंत्री कै. मधुकरराव पिचड यांनी विधीमंडळात केलेले कार्य राज्याला दिशादर्शक आहे. कै. मधुकरराव पिचड यांनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी मोठे निर्णय घेत त्यांचे जीवनमान उंचावले आहे.
अकोले पंचायत समितीचे सभापती ते विधीमंडळाचे सातवेळा आमदार हा राजकीय प्रवास कै. मधुकररावांच्या जडणघडणीचा महत्वाचा टप्पा राहिलेला आहे. पाणी आणि शेतकरी हे कृषी विकासाचे मुख्य सुत्र आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणांबरोबरच कै. मधुकरराव पिचड यांनी जलक्रांतीसाठी केलेले कार्य आमच्या सदैव स्मरणांत राहिल. बदलत्या राजकीय परिस्थितीत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अनेकवेळा संघर्ष करावा लागला मात्र त्यातही कै. मधुकरराव पिचड यांनी दिलेले पाठबळ स्पृहनिंय आहे.
अकोले परिसराची कामधेनु म्हणून अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यासाठी आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच साखर कारखानदारीतील प्रत्येक कौशल्य कै. मधुकरराव पिचड यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडुन आत्मसात करत राज्याच्या सहकार चळवळीत एक वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या जाण्याने आपण एका बहुआयामी व आदिवासी बांधवांसाठी स्मरणीय कार्य करणाऱ्या मोठ्या नेतृत्वास मुकलो आहोत. बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने देखील श्रध्दांजली व्यक्त करण्यात आली आहे.