शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : संविधानाच्या विटंबनेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनास शेवगाव शहरात आज सोमवारी कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परभणी येथे संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर संविधानाच्या विटंबने विरोधात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या आंदोलकाचा रविवारी न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेचे परभणीसह राज्याच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले. रिपब्लिकन सेनेने या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दिनांक १६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
त्यानुसार तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील कान्ती चौकात निषेध व्यक्त केला. सकाळी काही कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. त्यानंतर क्रांती चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख रस्त्यावर वाहनांची दोहोबाजूनी मोठी रांग लागली होती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.