शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : मराठवाड्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील ‘मराठा आरक्षण चळवळीतील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा शेवगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगडे व पोलिस निरिक्षक समाधान नागरे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले असून यासंदर्भात लोक प्रतिनिधीनी हा प्रश्न विधानसभेत मांडून कै. देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना म्हणजे केवळ एका व्यक्तिवर झालेला हल्ला नसून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीवर केलेला मोठा आघात आहे. या घटनेचा गुत्पचर विभागाकडून सखोल तपास करुन आरोपींना तसेच त्यामागे असणाऱ्या कोणत्याही राजकीय वरदहस्त किंवा सुत्रधाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना सह आरोपी करून त्याचेवर कडक कारवाई
करावी.
संबंधित आरोपींची नार्को टेस्ट करून सत्य उघड करण्यात यावे. तसेच सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून या निर्दयी हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करून दोषींना पाठीसी घालण्याचा प्रयत्न केला त्यास कायम स्वरूपी निलंबित करण्यात यावे. अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली असून या मागण्या मान्य झाल्या नाही तर सकल समाज संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या ढिसाळ धोरणा विरुद्ध राज्यभर उग्र आंदोलन पुकारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.