शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा अवमान करणारे वक्तव्य गृहमंत्री अमित शहांनी केल्याच्या निषेधार्थ शेवगावात आज गुरुवारी विविध संघटनानी आंदोलने करून निषेध नोंदविला आहे. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय दलित अधिकार संघटनेच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने येथील डॉ. आंबेडकर चौकात आंदोलने करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांची खिल्ली उडविली हा संपूर्ण देशाचा अपमान असल्याने केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी त्वरित राजीनामा द्यावा. तसेच शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी मागणी करून आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, शहराध्यक्ष प्रितम गर्जे, माजी नगरसेवक कैलास तिजोरे, विजय मगर, लक्ष्मण मोरे, संतोष पटेकर, खुशाल कसबे शेख सलीम जिलाणी, दिलीप वाघमारे, बाळू साळवे, मधुकर सरसे, समदभाई काजी, सुखदेव गायकवाड, कडु मगर, शिवाभाऊ, व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वंचितचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय दलित अधिकार संघटनेच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत चूकीचे, अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहांचा जाहीर निषेध करून त्यांना बडतर्फ करावे. तसेच परभणीतील पोलिसांच्या दडपशाहीतून बळी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणांच्या मृत्यूची न्यायिक चौकशी करण्यात यावी. त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करून मुख्य आरोपी व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार निदर्शने व प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष पाटील लांडे, कॉ. संजय नांगरे, भगवानराव गायकवाड, संदिप इथापे, बापूराव राशिनकर, अशोक नजन, बबनराव पवार, दत्ता आरे, विष्णू गोरे, ॲड. भागचंद उकिरडे, अरुण घाडगे, संतोष पटवेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे आदी सहभागी झाले होते.