शिर्डी प्रतिनिधी, दि. १७ : सन १९९२ पासून हॉटेल स्वामी रिसॉर्ट जवळील आरक्षण असलेल्या रस्त्याचे काम शासनाच्या लाल फितीत अडकल्याने या परिसराच्या विकासासाठी मोठी खिळ बसली असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालून सदरचा रस्ता होण्यासाठी मार्ग काढावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सन १९९२ पासून शिर्डी शहरातील हॉटेल स्वामी रिसॉर्ट ते निमगाव बायपास रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आरक्षण टाकले होते. परंतु शिर्डी- राहाता या मोठ्या लोकसंख्येच्या गावांना सतत होणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पिंपरी निर्मळ ते सावळीविहीर असा १४ किलोमीटरचा बायपास मंजूर करून तो सुरू केला.
कालांतराने सदर रस्ता शिर्डी शहराच्या झपाट्याने झालेल्या नागरिकीकरनामुळे शहराच्या अंतर्गत येत असल्याने सदर रस्ता शिर्डी नगरपरिषदेकडे हस्तातरण करण्याबाबत लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१२ साली शिर्डी नगरपरिषदेला दिल्यानंतर सदरचा रस्ता हा शिर्डी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामधून जाणाऱ्या रस्त्यावर आरक्षण असल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जमिनीचा विकास करता येत नव्हता त्यामुळे रस्ता तरी करा किंवा आमची जमीन ताब्यात घेऊन आम्हाला त्या बदल्यात मोबदला द्या अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागल्याने गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या आरक्षणामुळे परिसराचा विकास होत नसल्यामुळे नागरिकांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सदरचा हा ४५ मीटर रस्त्याची रुंदी कमी करावी अशी मागणी केली.
नागरिकांच्या मागणीचा विचार करत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४५ मीटर रस्ता हा २४ मीटर केला. तरी देखील शिर्डी नगरपरिषदेकडे हा २४ मीटरचा रस्ता करण्यासाठी नागरिकांच्या या रस्त्यात जात असलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी आर्थिक तरतूद होत नसल्यामुळे व या रस्त्याच्या आरक्षणामुळे नागरिकांना घर बांधण्याकरिता तसेच इतर व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने व रस्त्याचे आरक्षण असलेले अनेक नागरिकांन हे अल्पभूधारक असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना घर बांधण्याकरिता तसेच व्यवसाय करण्याकरिता पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज घ्यावे लागते.
परिणामी पतसंस्थेचे कर्जाची व्याज आकारणी नागरिकांना परवडत नसल्यामुळे व रस्त्यावर असलेल्या आरक्षणामुळे परिसराचा विकास होत नसल्याने कर्ज घेतलेल्या नागरिकांना कर्जाचे हप्ते देणे मुश्किल होत आहे. यावर पर्याय काढण्याकरिता या परिसरातील नागरिकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना या रस्त्या संदर्भात आपण काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती केल्यानंतर त्यांनी या प्रश्नाबाबत बैठक घेऊन हॉटेल स्वामी रिसॉर्ट ते एअरपोर्ट रोड पर्यंतचा रस्ता हा १२ किंवा १८ मीटर करून दिला जाईल तसा ठराव शिर्डी नगरपरिषदेकडून केला जाईल तसेच शासन दरबारीं पाठपुरावा करून यावर असलेले वाढीव आरक्षण देखील रद्द केले जाईल अशी ग्वाही देत रस्त्याच्या मध्यभागी नगरपरिषदेच्या माध्यमातून आखणी करून देतं नागरिकांनी रस्त्या होण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी असे आव्हान त्यांनी केले आहे.
गेल्या ३३ वर्षापासून ४५ मीटर रस्त्याच्या आरक्षणामुळे परिसराचा विकास होत नाही परिणामी नागरीकांना घर बांधण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळत नाही किंवा जागा एन.ए. करता येत नाही. त्याकरिता नागरिकांनी १२ किंवा १८ मीटर रस्ता करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन उर्वरित रस्त्याचे आरक्षण उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या पर्याय जवळपास ९५ टक्के नागरिकांनी मान्य केला आहे. परिसराचा विकास होण्यासाठी उर्वरित नागरिकांनी देखील हा रस्त्या होण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.