शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे असे तंत्रज्ञान जे मशीनला माणसाप्रमाणे विचार करण्यास आणि प्रतिक्रिया देण्यावर लक्ष केंद्रित करते. चाट जी.पी.टी. ही एक त्यातील प्रचलित प्रणाली असल्याची माहिती ज्येष्ठ संपादक सुधीर लंके यांनी दिली.
येथील न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात आयोजित हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या वेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्याने एखाद्या विषयाचे चौकसपणे वाचन व आकलन करून विषय चिकित्सक पद्धतीने मांडला पाहिजे. वाद विवाद स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना विषयाचे खंडन आणि मंडन करता आले पाहिजे.
या स्पर्धेसाठी राज्यातील विविध विद्यापीठांतील २० महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत आकाश बोडखे ओंकारनाथ मालपाणी लॉं कॉलेज संगमनेर, याने प्रथम क्रमांक द्वितिय क्रमांक प्रथमेश गिरी एम.पी. लॉ कॉलेज छ. संभाजीनगर याने तर, तृतीय क्रमांक निखील बोडखे, न्यू आर्टस् कॉलेज शेवगाव, यांने पटकावले. तर शेख इरफान, ओंकारनाथ मालपाणी लॉं कॉलेज संगमनेर, सायली लहाने .के.जे. सोमैया कोपरगाव व प्रणया माने जनता कॉलेज रुईछत्तीसी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. तर सांघिक करंडक छत्रपती संभाजीनगरच्या एम.पी. लॉ कॉलेज या महाविद्यालयाने पटकावला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, डॉ. गजानन लोंढे, डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी काम पहिले. यावेळी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे, संस्थेच्या सदस्या निर्मलाताई काटे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. बाळकृष्ण मरकड, उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी स्वागत केले. डॉ. गोकुळ मुंढे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेसाठी डॉ. संदीप मिरे, समीर दाणे, डॉ. रवींद्र वैद्य, ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी चक्रे, प्रा. मोहिनी जाधव यांनी विशेष योगदान दिले. प्रा. सोपान नवथर व प्रा. आशा वडणे यांनी सुत्रसंचलन केले. तर प्रा. राम कोरडे यांनी आभार मानले.