सोमैयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली मलेशियन संस्कृतीची माहिती

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : के . जे. सोमैया महाविद्यालय व यू.आय.टी.एम. मारा युनिव्हर्सिटी केदाह ब्रँच, मलेशिया दरम्यान मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या “विंडो टू द बॉर्डरलेस वर्ल्ड २.० (डब्ल्यू . बी. डब्ल्यू २.०), इंटरकल्चर कम्युनिकेशन व्हाया इंटरनॅशनल कॉलॅबोरेशन प्रोजेक्ट” या ऑनलाईन अंतरसांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमाचा समारोप समारंभ नुकताच पार पडला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. याप्रसंगी सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मलेशियामधील अत्यंत प्रतिष्ठीत यू.आय.टी.एम. मारा युनिव्हर्सिटीशी सलग २ महिने संवाद साधला व आपल्या संस्कृतीचे आदान-प्रदान केले.  

या कार्यक्रमाला मारा युनिव्हर्सिटीच्या केदाह ब्रँचच्या इंग्रजी भाषा अकादमीचे प्रमुख डॉ. अझलान अब्दुल रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम सोमैया महाविद्यालय व यु.आय.टी.एम.मारा युनिव्हर्सिटी, मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर सियाजलिती इब्राहिम मॅडम व डॉ. रवींद्र जाधव हे उपस्थित होते. 

डॉ. अझलान अब्दुल रहेमान यांनी आपल्या मनोगतात “दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराच्या माध्यमातून आयोजित केलेला हा आंतरसांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रम अत्यंत आगळावेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे दोन्ही देशातील संस्कृतीचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांनाही मिळाली. दोन्ही संस्था अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. यामध्ये चर्चासत्र, कॉन्फरन्स, संशोधन कार्यशाळा  व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. यामुळे दोन्ही संस्थेमधील सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन संबंध दृढ झाले आहेत, असे मत व्यक्त केले. 

 याप्रसंगी प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. रवींद्र जाधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करून या कार्यक्रमात महाविद्यालयातील व यू.आय. टी .एम.विद्यापीठातील एकूण २०० विद्यार्थ्यांनी व २० प्राध्यापकांनी भाग घेऊन दोन्ही देशातील संस्कृतीचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी देवाण-घेवाण अंतर्गत’ व ‘नवीन शैक्षणिक धोरणा’नुसार परदेशी विद्यापीठांशी जोडणे व त्यांच्या विविध कौशल्यांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देणे.

भारताची सांस्कृतिक ओळख जगामध्ये पोहचविणे, योगा, पारंपरिक नृत्य व संगीत यांचा प्रचार-प्रसार करणे व भारतातील विविधतेतील एकात्मता जगाला दाखविणे हा हेतू असल्याचे सांगितले. जगात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्या देशाच्या संस्कृतीची ओळख करून घेणे आवश्यक आहे. संस्कृतीची ओळख होणे म्हणजे खऱ्या अर्थाने जवळ येणे आणि त्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे, असे मत  व्यक्त केले. 

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रोजेक्ट डायरेक्टर मॅडम सियाजलिती इब्राहिम यांनी हा कार्यक्रम दोन्ही देशाला जोडणारा दुवा आहे व के.जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी भारतीय संस्कृतीचे सुंदर असे सादरीकरण केले असे  नमूद करून २०२१ मध्ये कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डब्ल्यू . बी. डब्ल्यू १.० या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर के.जे. सोमैया महाविद्यालयाबरोबर सामंजस्य करार केला व त्याअंतर्गत असंख्य शैक्षणिक, संशोधन चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन केलेत. या कार्यक्रमामुळे दोन्ही देशातील अंतर कमी झाले असून यामुळे दोन्ही देशातील शांतता व सामंजस्य  वाढीस लागेल याविषयी आनंद व्यक्त केला. 

मागील दोन महिन्यापासून  विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मलेशिया व भारतातील विविध ठिकाणे, शिक्षणपद्धती, खेळाडू व क्रीडा प्रकार, लोक व दंतकथा, वाहतूक सुविधा, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, पारंपरिक खेळ इ. विविध विषयावर माहिती सादर करून चर्चा केली तसेच तसेच फेसबुक ग्रुप वर  सांस्कृतिक माहिती  दिली.  

समारोप कार्यक्रमात गार्गी पाटील हिने भरतनाट्यम, मेघा सोनवणे व मानसी उपाध्ये यांनी राजस्थानी नृत्य, वैष्णवी ढाकणे, प्रज्वल ढाकणे व करिष्मा हलवाई यांनी योगाचे लाइव्ह प्रात्यक्षिक केले. मारा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीवर आधारित गीते सादर केली.  प्रतीक्षा रक्ताटे, फैझ  अदिता आणि  नूर इतकानं  या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  डॉ. शंकरैया कोंडा यांनी आभार मानले, तर प्रा. विजय सोमासे यांनी तांत्रिक बाबी सांभाळून कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅडम अस्नी, मॅडम रूबेखा, डॉ. नूर स्याजवानी, मॅडम शरीफाह स्याकिला, मॅडम श्याकिराह, मॅडम नूर अजला, मॅडम झवानी बद्री, डॉ. संजय अरगडे,  प्रा. विजय सोमासे, मुकेश माळवदे, उर्मिला होन मॅडम, कु. औताडे मॅडम,  चेतन धनगे, डॉ. शंकरैया कोंडा आणि दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांनी सतत ३ महिने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या कार्यक्रमामुळे आमचा आत्मविश्वास वाढला व दुसऱ्या देशाची संस्कृती समजून घेता आली.  आंतरराष्टीय स्तरावर सहभाग व सादरीकरण करायला मिळाले याचा आनंद व्यक्त करून मलेशियन मित्र तयार झाले त्यांच्याशी फेसबुक ग्रुप च्या माध्यमातून कायमस्वरूपी संवाद सुरु ठेवणार असून  भविष्यात मलेशिया देशात भेट देण्याची इच्छा व्यक्त केली तर मलेशियन विद्यार्थ्यांनी भारतात येऊन सोमैया महाविद्यालयाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.  असे कार्यक्रम घेणारे सोमैया महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे  याचा अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त करून  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. अॅड संजीव कुलकर्णी , विश्वस्त मा. संदीप रोहमारे आणि प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे  यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply