उद्योगांमधील घडामोंडींवर विद्यार्थ्यांनी नजर ठेवावी – देवकांत आगरवाल

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : नेहमी असामान्य बाबींचा विचार करा. चार वर्षात भरपुर कौशल्ये आत्मसात करा. वर्ग खोली व प्रयोगशाळेच्या बाहेर कृत्रिम बुध्दीमत्तेचा (एआय) वापर कसा होवु शकतो, याचा विचार करा. नियमित अभ्यासक्रमाच्या व्यतिरीक्त नविन येणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख करून घ्या. उद्योंगांमधील आधुनिक तंत्रज्ञान संदर्भातील घडामोंडींवर बारीक लक्ष ठेवा, इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स  (आयबीएम) कार्पोरेशन आपणास तंत्रज्ञान क्षेत्रात मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन आयबीएम करीअर एज्युकेशन विभागाचे प्रमुख देवकांत आगरवाल यांनी केले.

संजीवनी विद्यापीठच्या ‘आर्टिफिशीअल इंटिलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) व आर्टिफिशीअल इंटिलिजन्स अँड डेटा सायन्स (एआयडीएस)’ या विभागांचा आणि आयबीएम या १७५ पेक्षा जास्त देशात आपले जाळे असलेल्या अमेरिकन कंपनीशी परस्पर सामंजस्य करार झाला असुन या करारा अंतर्गत ‘आयबीएम सॉफ्टवेअर लॅब फॉर इमर्जिंग टेक्नॉलॉजिज’ या सेंटर ऑफ एक्सलंसचे उद्घाटन आगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनानंतर ते एआयएमएल व एआडीएस विभागांच्या विद्यार्थ्यांसमोर बोलत होते. यावेळी  विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, आयबीएम करीअर एज्युकेशनच्या कंट्री चॅनल मॅनेजर शीतल सोनी, करीअर टीआयक्युचे सीईओ आणि एमडी डॉ. गिरीधरन सी, चिफ टेक्निकल ऑफिसर श्री विजय नायडू, प्रो व्हाईस चांसलर डॉ. जे. जनेथ, डीन डॉ. पी. कविथा राणी, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, आदी उपस्थित होते.

प्रारंभी संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात सर्व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला.विद्यापीठ व आयबीएम यांच्यातील करारानुसार आयबीएमचे प्रतिनिधी प्रत्येक सत्रात एक विषय  शिकविणार असुन इंटर्नशिपही विद्यार्थ्यांना देणार आहे तसेच नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवडही करणार आहे.

यावेळी सोनी म्हणाल्या की, काय आणि कसे या शब्दांचा ध्यास घेवुन ठराविक वर्षांचे लक्ष्य (टार्गेट) निश्चित करून उच्च स्वप्ने पहावे आणि स्वप्ने साकार करण्यासाठी सतत नवनवीन शिकत रहा. दररोज किमान बारा तास शिकण्यासाठी वापरा. संजीवनी विद्यापीठ रोल मॉडेल म्हणुन पुढे येत आहे. मेट्रो शहरांपेक्षाही येथिल सुविधा व साधनसामग्री आधुनिक व चांगल्या आहेत. त्यांचा फायदा घ्यावा. येथुन चांगले शिक्षण घेवुन देशाची  सेवा करा.

डॉ. गिरीधरन म्हणाले की, शिक्षण म्हणजे प्रकटीकरण आणि परीपूर्णता, या दोनही बाबी प्रत्येक व्यक्तीत असतात. तुमच्याकडे आपल्या ज्ञानाची उंची वाढविण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. संजीवनीला मोठी यशस्वी परंपरा असुन देश परदेशात माजी विद्यार्थ्यांचे मेळावे होतात, हीच परंपरा पुढे चालु ठेवा.

आपल्या तंत्रज्ञानातील क्षमता इतक्या वाढवा की, नामांकित कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी आकर्षित झाल्या पाहीजे. आपला उद्देश, त्यासाठी परीपूर्णता, परीपुर्णतेसाठी सराव आणि उद्देश  सफल करण्यासाठी कृती या बाबी महत्वाच्या आहेत, असे डॉ. गिरीधरन शेवटी म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न  विचारले, त्यांची समर्पक उत्तरे देण्यात आली.