उद्या पासून १२वीची परीक्षा सुरु, शेवगाव तालुक्यात कॉपी मुक्त अभियानावर भर

शेवगाव प्रतिनिधी, १० :  मंगळवार दि. ११ पासून एचएससी बोर्डाची परीक्षा सुरु होत असून शेवगाव शहरातील पाच व तालुक्यातील सात अशा १२ केंद्रातून सुमारे चार हजारावर विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत. परीक्षा यंत्रणाही त्यासाठी सज्ज झाली असून यावेळी यंत्रणेने प्रकर्षाने कॉपी मुक्त अभियानावर भर दिला असल्याची माहिती पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी दिली.

यावेळी कोलते म्हणाल्या, कॉपी मुक्त अभियानासाठी गेल्या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील विविध विद्यालयात उद्बोधन करण्यात आले असून तालुक्यातील संवेदनाशिल असलेल्या सहा परीक्षा केंद्राची सरमिसळ करण्यात आली आहे. म्हणजे या केंद्रातील स्टाफ अन्य केंद्रावर टाकण्यात आला आहे.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली चारचार सदस्यांची चार तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची तीन तीन सदस्याची दोन अशा सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर दोन सदस्यांचे बैठे पथक ठेवण्यात आले असून सर्व केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शेवगावानील रेसिडेन्सिअल विद्यालय, काकडे विदयालय, भारदे विद्यालय, विखे विद्यालय, व न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय येथे तसेच ढोरजळगावला श्रीराम विद्यालय व ठकूबाई घाडगे विद्यालय, नवजीवन विद्यालय दहिगावने, चापडगाव, बोधेगाव, गोळेगाव व गायकवाड जळगाव येथे बाराविच्या परीक्षा होत आहेत.