शिर्डी प्रतिनिधी, दि. १३ : शिर्डी व पंचक्रोशीसह देशाच्या विविध भागातुन आलेल्या लाखाहून अधिक भाविकांनी आज भक्तीभावाने साईनगरीला परिक्रमेच्या माध्यमातून साई नगरीला प्रदक्षिणा घातली. चौदा किमी लांबीच्या परिक्रमा मार्गावर आज अक्षरश: भक्ती आणि आनंदाची उधळण झाली. ग्रीन एन क्लीन शिर्डीच्या पुढाकारातून तसेच साईसंस्थान, शिर्डी ग्रामस्थ, नगरपरिषद, पोलिस, महसूल व देशभरातील भाविकांच्या सहयोगाने आयोजित परिक्रमा सोहळ्याचे हे सहावे वर्ष होते.

रतलामच्या भाविकांनी आणलेल्या रथात साईप्रतिमा, याशिवाय विविध शाळांच्या चित्ररथासह वेगवेगळे १५ रथ, समोर अब्दागीरी, छत्र, चामरे घेतलेले ५०० भाविक, लेझीम, बॅन्ड पथके, साईसच्चरित्रातील सादर करण्यात आलेले जीवंत देखावे, साईभजन गाणारे कलाकार, महाराष्ट्र व तमिळनाडूतील पारंपरिक वाद्ये, वारकरी, ठिकठिकाणी सुवासिणींकडून होणारे औक्षण, पुजन, परिक्रमा मार्गावरील घरांघरावर उभारण्यात आलेल्या गुढ्या, धुनी असलेला रथ, परिक्रमा मार्गावर दोन्ही बाजूंनी काढलेल्या रांगोळ्या, फुलांची सजावट, १५ स्वागत कमानी लक्षवेधी ठरल्या. परिक्रमेत महिलांची संख्या लक्षणीय होती. परिक्रमेच्या शेवटच्या टप्पात प्रत्येक भाविकाला साई संस्थानकडून बुंदी प्रसाद देण्यात आला.

परिक्रमावासियांसाठी अनेक ठिकाणी ग्रामस्थ व भाविकांकडून दूध, चहा, नास्ता, थंड पेये, बिस्किट, फळे पाणी याची रेलचेल होती. भाविकांसाठी १०० मोबाईल टॉयलेट्स, १२ आडोसा स्वच्छतागृह, १३ रुग्णवाहिका, ५ वैद्यकीय पथके आणि १०० पॅरामेडिकल कर्मचारी व १००० विद्यार्थी स्वयसेवकांची व्यवस्था होती. परिक्रमेच्या पाठोपाठ नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्यांनी रस्ता स्वच्छ केला.

खंडोबा मंदिरात आरती करून पहाटे परिक्रमेचा आरंभ झाला. तर दुपारी शताब्दी मंडपात सांगता झाली. यंदाच्या परिक्रमेला यावेळी महंत रामगिरी महाराज, काशिकानंदगिरी महाराज, देऊळकर महाराज, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, वंदना गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने,

पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके पाटील, अर्चनाताई कोते, विजय कोते, सचिन तांबे, नितीन कोते, नीलेश कोते, रमेश गोंदकर, रविंद्र गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, रविंद्र कोते, अरविंद कोते, ग्रिन अॅन्ड क्लिनचे अध्यक्ष अजित पारख, डॉ. जितेंद्र शेळके, अॅड. अनिल शेजवळ, संजय शिर्डीकर, मनीलाल पटेल, विशाल तिडके, ताराचंद कोते, किशोर बोरावके आदींची प्रमुख उपस्थीती होती.

एका नवदांपत्याने आज सकाळी विवाहपूर्वी जोडीने रथ ओढला, तर निमगाव येथील एका पित्याने आपल्या अपंग मुलाला व्हील चेयर वरुन परिक्रमा घडवली.
