कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची अडचण सातत्याने भासते आहे. एसटी महामंडळाने नियोजित केलेल्या बस या वेळेवर अनेक ठिकाणी येत नाहीत तसेच उशिराने बस सोडल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास उशीर होतो.

अनेक गावांमध्ये अद्यापही गाव बसेस जात नाही असे तेथील नागरिक खंत व्यक्त करतात त्यामुळे प्रवाशांना वारंवार खाजगी वाहनांची वाट पाहत बसावे लागते अशा समस्या पालक आणि विद्यार्थ्यांनी केल्याने सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव बस आगाराला समस्या सोडविण्याची सूचना केली आहे.

अनेक युवती या उच्चशिक्षणासाठी शहरात येतात. परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून येणाऱ्या बस तुटवडा भासतो आहे. अधिकच्या ज्यादा बस परीक्षा काळात जिथे आवश्यक आहे तिथे सोडल्या जाव्या.मागणी असेल त्या गावात गाव बस सुरू होणे आवश्यक आहे.दळणवळणाच्या सुविधेचा विलंब हा विद्यार्थ्यांना अभ्यास आणि मानसिकता यावर परिणाम करणारा ठरतो याची दखल घेतली जावी.

सकाळी ८.३० वाजेची बस ९.१५ तर कधी कधी ९.३० पर्यंत उशिरा येते असे झाल्यास विद्यार्थांना परीक्षेचा कालावधी, अभ्यास, परीक्षा केंद्रावर वेळेत जाण्यासाठी होणारा विलंब होऊ नये यासाठी आगाराने वेळेत बस पाठविणे आवश्यक आहे. स्थानकावरून निघणाऱ्या परतीच्या बस वेळेत पाठवाव्यात कारण पुन्हा गावाकडे येण्यासाठी उशीर झाल्यास विद्यार्थ्यांची हाल होते यावर लक्ष देण्याची गरज आहे.

परिवहन महामंडळाने या काळात सजग रहावे लागणार आहे. आगामी काळात परीक्षा संपल्यानंतर देखील अनेक युवक युवती विविध कोर्स करण्यासाठी कोपरगाव शहरात येतात. उष्णतेचे दिवस तोंडावर असताना अधिक काळ बसची वाट बघत नागरिकांना आणि विद्यार्थांना बसावे लागणार नाही याची दक्षता घेऊन वेळेवर आणि पुरेशा बस सुरू ठेवाव्यात असेही शेवटी कोल्हे म्हणाले आहेत.
