सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज – रमेशगिरी महाराज

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडला. प्रतिष्ठानचे संस्थापक युवानेते विवेक कोल्हे आणि युवासेवक यांनी अतिशय चोख नियोजन केले होते. आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत सर्व क्षेत्रातील, विविध धर्मातील वधू-वर यात सहभाग घेत विवाह पार पाडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे.

संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि सामाजिक काम हे एक समीकरण असुन सर्व समाजाच्या उन्नतीसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेला लोकमंत्र सर्व कोल्हे कुटुंबीय व युवानेते  विवेक कोल्हे सर्वार्थाने पुढे घेऊन जात असुन सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज यांनी केले.

यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संत महात्म्यांचे पुजन करून उपस्थीतांचे स्वागत केले. शुभआशीर्वाद देताना प.पू. रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की, कन्यादान पवित्र संकल्प असून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आजपर्यंत शेकडो वधु-वरांचे विवाह पाडले असून एका अर्थाने अशा सोहळ्याच्या माध्यमातून पालकत्व स्विकारून त्यांच्या आनंदात भर घालत आहे हे विशेष. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या उत्कर्षात अलौकिक योगदान दिले असुन त्यांचा वसा सर्व कोल्हे कुटुंब पुढे चालवत आहे ही अभिमानाची बाब आहे. कुंभमेळा पर्वणी काळात पाचवा सर्वधर्मिय विवाह सोहळा पार पडणे ही मोठी अनुभूती आहे, असे ते म्हणाले.

सर्वांमध्ये ईश्वर असून सर्वधर्मीय समाजाला एकत्र करण्याचे काम विवेक कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे असे प्रतिपादन अडबंगनाथचे अधिपती ह.भ.प अरुणनाथगिरी महाराज यांनी केले. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून माणुसकी आणि एकतेचा संदेश विवेक कोल्हे व त्यांचे सर्व स्वयंसेवक देत असल्याचे मौलाना निसार यावेळी बोलतांना म्हणाले, तर पुण्यकर्माचा कर्णधार विवेक कोल्हे आहे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जे काम केले आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे असे भंते आनंद सुमंतश्री यांनी सांगितले.

या सोहळ्याचे प्रारंभी विवेक कोल्हे प्रास्तविक करताना म्हणाले की, सर्व समाजामध्ये कळत नकळत आंतरिक तेढ काही प्रमाणात निर्माण झाली असुन सेवा हाच धर्म हा विचार घेऊन माणुसकीच्या नात्याने या माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणीतून ती दरी कमी करण्यांसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने काम सुरू आहे. संकटे ही सर्वांवर येत असतात त्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे. आजवर वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, मोफत फिरता दवाखाना, कोविड सेंटर, पूरग्रस्त भागात सेवा कार्य, एक राखी जवानांसाठी, गंगा आरती, प्रबोधन उपक्रम यासह हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सुरू ठेवत काम सुरू आहे. हा उपक्रम अनेकांच्या आर्थिक समस्येला उपाय ठरत आहे तर अगदी लाखोंचे पॅकेज घेणारे आयटी क्षेत्रातील वधू वर देखील यात सहभागी आजवर झाले आहेत.

परमेश्वररुपी पाणी एकच आहे फक्त भांडी वेगवेगळी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या धर्मात देखील माणुसकीची शिकवण आहे त्या मार्गाने ऐक्य टिकले तर मोठी प्रगती करता येणे शक्य आहे असा बोधत्मक दाखला यावेळी शेवटी त्यांनी दिला. यावेळी विविध अध्यात्मिक संस्थांनांचे  महंत, संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, प्रणवदादा पवार यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, विविध संस्थेचे चेअरमन, संचालक,आजी-माजी पदाधिकारी, निमंत्रित मान्यवर, वऱ्हाडी मंडळी, नागरिक, युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन‌ई चौघड्यांची साथ, फुलांच्या व रांगोळीच्या साथीने सजलेले रस्ते, घोड्यावर आरुढ झालेले नवरदेव, बँडबाजा-संबळाची साथ, नाचण्याचा मनसोक्त आनंद घेणारी युवा पिढी, फटाक्यांची जंगी आतषबाजी, फुलांच्या अक्षदा, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाचा शाही आस्वाद, उत्तम नियोजन, तुळशीला पाणी घालणाऱ्या रेणुकाताई कोल्हे व सवाष्णी, परमेश्वरी साथ हे सगळे पाहून विवाह सोहळ्याच्या शाही मिरवणुकीचा भास कोपरगावकरांना पहावयास मिळाला. त्याच प्रमाणे विवेक कोल्हे यांनी मिरवणुकीत नाचण्याचा आनंद घेत सर्वांचा उत्साह द्विगुणित केला.

Leave a Reply