राहाता प्रतिनिधी, दि. २२ : राहाता शहरातील योगेश किसन वाघमारे वय २३ वर्ष या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारल्याचे गुन्ह्यातील १८ आरोपीं पैकी ६ आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित १२ आरोपींना निर्दोष सोडले आहे शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे

याबाबतचे वृत्त असे की २३ मे २०२२ रोजी श्रीरामपूर येथील एका हॉटेल स्थळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून राहाता येथील फिर्यादी किसन वाघमारे यांचा मुलगा योगेश किसन वाघमारे वय २३ वर्ष रा. राहाता यास आरोपी ललित पाळंदे, राहुल धीवर यांनी त्यांचे मोटरसायकल वरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पळवून नेले.

त्यास आंबेडकरनगर मधील घरकुलातील संजय दादा निकाळे यांचे घरी नेले तेथे रवी दशरथ कटारनवरे, विरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, दशरथ कटारनवरे, भूषण संजू निकाळे, योगेश निकाळे, संजय दादू निकाळे, रतनबाई दशरथ कटारनवरे, मनीषा वाघमारे, अमित चंद्रकांत वाघमारे, संगीता संजय निकाळे, उत्कर्ष उर्फ भैय्या सोमनाथ लुटे, सोमनाथ लुटे, विशाल मोकळ, महेश सोमनाथ पाळंदे, गौतम सोमनाथ पाळंदे, अमोल सोमनाथ पाळंदे, सर्व रा. राहाता यांनी एकत्रित येऊन संगणमत करून रवी कटारनवरे याने योगेश वाघमारे यांच्या छातीत तलवारीने तसेच संजय निकाळे, ललित बाबासाहेब पाळंदे यांच्या हातात कोयता होता त्यांनी योगेश वाघमारे याचे डोक्यात व त्याचे हाताचे बोटावर वार करून योगेश वाघमारे याला जीवे ठार मारले.

तर साक्षीदारांना जखमी केले असल्याचे फिर्यादीवरून राहाता पोलीस स्टेशनला गुरन २४३/२०२२ भादवी क्रमांक ३०२, ३६३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे एकूण १८ आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी करून न्यायालयात आरोपीं विरोधात दोषारोपपत्र सादर केले होते. या गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय राहाता यांच्यासमोर झाली या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.

सदर खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या समोर आलेला सबळ पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून १८ आरोपींपैकी राहुल एकनाथ धीवर, ललित बाबासाहेब पाळंदे, रवी दशरथ कटारनवरे, विरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, विशाल मायकल मोकळ, योगेश संजय निकाळे सर्व राहणार आंबेडकरनगर या सहा जणांना अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवार दि २१ फेब्रुवारी रोजी सुनावली आहे.

सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डी. बी. पानगव्हाणे, पी. व्ही. बुलबुले यांनी काम पाहिले त्यांना सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले यांनी सहाय्य केले. २१ फेब्रुवारी रोजी राहाता न्यायालयात या आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार असल्याने आरोपींना काय शिक्षा होती हे ऐकण्यासाठी न्यायालया बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या गुन्ह्यतील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
