सहकाराचा मुळ अर्थ सहकार्य – कर्नल विनीत नारायण        

रेणुकामाता देवस्थानात शेतकरी प्रशिक्षण व शासकीय अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबीर             

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : सहकारी चळवळ देशांत सर्वाधीक महाराष्ट्र राज्यात त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधीक रुजली आहे. खाजगी उद्योगांत एकच तर सहकारी उद्योगांत प्रत्येक भागधारक मालक असतो. सहकाराचा मुळ अर्थ सहकार्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी विकास मंडळाचे ( एमसीडीसीचे ) विभागीय अधिकारी कर्नल विनीत नारायण यांनी केले.

तालुक्यातील  श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थानामध्ये श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह अर्बन क्रेडीट संस्था व राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे (एनसीडीसीचे ) ‘लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर कोऑपरेटिव रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र’  यांच्या सहयोगाने शुक्रवारी (दि २१ ) एक दिवशीय शेतकरी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार प्रशांत सांगडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कृषक समाजाचे  राज्याध्यक्ष बाप्पुसाहेब भोसले  मंचावर होते.

कर्नल नारायण पुढे म्हणाले, शेतकरी वर्गांतअर्थसाक्षरतेचा अभाव सर्वाधीक आहे. पिकविता येते, मात्र विकता येत नाही. उत्पादक ते विक्रेता बनण्याची संधी एनसीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. श्री रेणुकामाता मल्टीस्टेट संस्था अर्थ सहाय्यासाठी पुढे आली आहे. आज स्पर्धेचा जमाना आहे,  तेव्हा निर्यातक्षम शेतीमालाचे उत्पादनासह विक्रीतंत्र आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (FFPO) असलेल्या योजनांचे प्रस्ताव व अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

श्री रेणुका माता मल्टीस्टेटचे प्रवर्तक तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव म्हणाले, आपण उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रीया करून साठवणुकीचे तंत्र शिकले पाहिजे. सहकारी संस्था बचत गटांना अर्थसहाय्य मिळु शकेल. मात्र अनुदान प्राप्ती पुरताच सहभाग नको आहे. ते उद्योजक होऊ शकत नाहीत. शहरी व ग्रामीण व्यवसायांचा आढावा घेतल्यास  उद्योगांचा खरा स्रोत ग्रामीण भागातच असल्याचे मान्य करावे लागेल.

प्रांताधिकारी प्रसाद मते, ज्येष्ठ. पत्रकार सुधीर लंके, सुरभी हॉस्पिटलचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी एनसीडीसीच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील शेतकरी बांधवांपर्यत पोहचविण्यासाठी येथे दिलेल्या माहितीच्या आधारे शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

महेश कडलग यांनी किसान क्रेडिट कार्ड, अपघात गटविमा तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. एनसीडीसीच्या सहाय्याने कार्यरत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे नकुल सदाफुले ह्यांनी कृत्रिम मत्स्यपालन व्यवसाय हा आजच्या काळात एक यशस्वी, प्रतिष्ठित आणि लघु उद्योग म्हणून प्रस्थापित होत असल्याचे  सांगून ह्याच क्षेत्रात यशस्वी उद्योजक बनण्याची स्वतःची वाटचाल सांगितली.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उद्योजक शामराव जाधव, महेश कडलग, बाळासाहेब चौधरी, सुभाष केकाण, आशिष शिरसाठ, अमोल बडे, सुनिल रासने  यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जिल्ह्यातील कृषी उत्पादक संस्थेचे प्रतिनिधी,सभासद आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेणुका परिवाराचे  राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, कार्तीक मुनगुंटीवार, अतुल इथापे आदींनी संयोजनास मेहनत घेतली. श्रीमंत घुले यांनी सुत्रसंचलन केले, तर गणेश शेंडगे यांनी आभार मानले. 

Leave a Reply