कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : “सेवा हाच धर्म” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या चरणसेवेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. अहिल्यानगर येथे विविध भागांतून येणाऱ्या संतांच्या पालख्यांचे आणि दिंड्यांचे उत्साहात स्वागत करत, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी वारकऱ्यांना चरणसेवा करून उत्तम सेवा केली.

या सेवाकार्यात युवानेते विवेक कोल्हे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली अनेक सेवाभावी युवक सहभागी झाले होते. सेवेसाठी उत्सुक असलेल्या या तरुणांनी अपार श्रद्धा, भक्तीभाव आणि मन:पूर्वक समर्पणाने कार्य केले.

संजीवनी युवा प्रतिष्ठानने या वारीनिमित्त केवळ चरणसेवा केली नाही, तर वारकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अनुभवांमधूनही बोध घेतला. अबालवृद्ध वारकऱ्यांनी या सेवाभावाचे मनापासून कौतुक करत संजीवनीच्या सेवकांवर भरभरून आशीर्वाद दिले.

वारी म्हणजे भक्तीची गंगा तर सेवा म्हणजे भक्तीतील कर्मयोग. संजीवनी युवा प्रतिष्ठानने ही दोन्ही मूल्ये एकत्र जपून वारीतील सेवा परंपरेला नवा आयाम दिला आहे.

यावेळी सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विशाल गोर्डे,सिद्धार्थ साठे, सतीश निकम, प्रशांत संत,रोहित कणगरे, शेखर कुऱ्हे, समाधान कुऱ्हे, कुणाल आमले, शुभम जीरे, प्रताप टेके, अभिजीत सूर्यवंशी, राहुल माळी यांचा विशेष सहभाग होता.

वारीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना आधार देणारी ही चरणसेवा म्हणजे श्रद्धा, सामूहिकता आणि सामाजिक बांधिलकीचे सशक्त उदाहरण ठरली. संजीवनी युवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम येणाऱ्या काळात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
