कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव मतदारसंघात सध्या निधी उपलब्ध असूनही विकासकामांचा बोजवारा उडालेला आहे. सत्ताधारी आमदारांचे पदाधिकारीच कामे होत नसल्याचे निवेदन देत असल्याने विकास कामे किती अडथळ्यांत अडकली आहेत, हे स्पष्ट होते. जेव्हा खुद्द आमदारांचेच ठेकेदार ऐकत नाहीत, तेव्हा सामान्य जनतेचे काय ऐकणार ? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

नुकतेच नगरपालिकेत आमदारांचे कार्यकर्तेच विकासकामे न झाल्याबाबत तक्रारी करताना दिसले. निधी असूनही ठेकेदार काम करत नाहीत, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. मतदारसंघात ठेकेदार कोणाचे आहेत? त्यांना कामे कोण करू देत नाही ? नक्की निधी उपलब्ध आहे की आजवर फक्त हजारो कोटींचा केवळ कांगावा झाला हे जनतेसमोर यायला हवे. केवळ शहरच नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघातील विकासाचे ऑडिट करणे आता काळाची गरज झाली आहे.

अनेक ठिकाणी रस्ते निकृष्ट दर्जाचे का केले आहेत? ठेके मिळवण्यासाठी काही पडद्यामागचे व्यवहार तर कुणी करत नाही ना ? यावर देखील खुलासा होणे आवश्यक आहे. हजारो कोटींचा निधी आला तरी तो नेमका गेला कुठे? निधी असून कामे नसेल होत तर मग तो निधी जातो कुठे असा सवाल करत आढाव यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भाजपने युती धर्म पाळत आमदार काळेंना सत्तेत आणले, मात्र त्यांचे कार्यकर्ते जर त्यांच्या विरोधकांची भूमिका घेत असतील आणि कोणी तरी व्यक्ती कामे होऊ देत नाही असे म्हणत असतील, तर याचा अर्थ सत्तेत असूनही आमदार साहेब अस्तित्वात नाहीत असा गैरसमज जनतेत पसरतो आहे. याशिवाय ठेकेदार आमदारांचे ऐकत नसतील तर पाणी कुठे मुरते आहे हे गंभीर आहे.

सत्ताधारी मित्रपक्षांचे पदाधिकारी जर असे बेछूट वक्तव्य करत असतील, तर ते प्रत्यक्षात आमदारांच्या निष्क्रियतेची कबुलीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसेल, तर मतदारसंघ अडचणीत येतो. अवैध धंदे, गुन्हेगारी आणि जनतेच्या समस्या वाढत असताना सत्ताधारी जर स्वतःच गळा काढत असतील, तर जनतेने काय समजून घ्यावे? असा रोखठोक सवाल करत आढाव यांनी रस्त्यांच्या कामांमागे शिफारशी, संमती आणि काही वेगळे असल्यास त्या व्यवहारांची चौकशी व्हावी अशी अपेक्षा आढाव यांनी व्यक्त केली आहे.

विकासाचा बोजवारा उडाल्याने काही तरी कल्पोकल्पित विषय घेऊन जनतेला वेड्यात कुणी काढू नये तर कामे करावी. कामे निकृष्ट आणि दिरंगाईने होत असतील तर हा टक्याच्या धक्का तर ठेकेदारांनी देणे चालवले नसेल ना अशी चर्चा जोरदार रंगली आहे.
