कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने समता इंटरनॅशनल स्कूल येथे ४ जुलै २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार सप्ताहाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सहकाराची ओळख आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. विद्यार्थ्यांना सहकाराची व्याप्ती, त्याचे फायदे आणि ग्रामीण भागातील सहकाराच्या महत्त्वाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

रुद्राक्षे यांनी आपल्या मार्गदर्शनात सहकार म्हणजे पारंपरिक सावकारकीवर मर्यादा घालणारी आणि सामान्यांना आर्थिक साहाय्य करणारी चळवळ असल्याचे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात काका कोयटे यांनी “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या उक्तीचा संदर्भ देत सहकाराचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी कोपरगाव तालुक्यातील ९० सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना नियामक मंडळ परिपत्रक व कर्ज नियमावली याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात पतसंस्थांच्या कारभारातील पारदर्शकता आणि शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले ते समता सहकार वाटिकेचे उद्घाटन, जे समता इंटरनॅशनल स्कूल येथे संदीप रुद्राक्षे यांच्या हस्ते पार पडले. त्याचप्रमाणे, समता पतसंस्थेच्या ‘बाल गौरव ठेयात व योजना’ अंतर्गत सर्वाधिक बचत ठेव करणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यशवंत चव्हाण, निखिल काले, प्रीती चव्हाण, आराध्या बोरणारे, आदी खाबिया, राजविका घुमरे, अभिराज पाडोळ, ऋषिकेश कोळपे, अर्णव आढाव आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य समीर आत्तार यांनी केले. यावेळी आहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे संचालक आशुतोष पटवर्धन, सहकारी संस्था, कोपरगाव कार्यालयाचे राजेंद्र राहणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली अधिकारी गिरीश ताम्हाणे, अनिल पाटील अक्षर सोल्युशनचे अद्वैत माडगुळकर कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे गोपीनाथ निळकंठ, अशोक कोठारी, हाशिम पटेल आदीसह पतसंस्था प्रतिनिधी उपस्थित होते. तालुका फेडरेशनचे संचालक केशवराव भवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश निळकंठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
