कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करत एक आदर्श निर्माण केला. विविध विकास कामातून त्यांनी शहरांचा कायापालट केला. माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी मागणी केल्यानंतर कोपरगाव नगरपालिका हद्दीमध्ये नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरासाठी 20 लाख रुपयाचा सीसीटीव्हीसाठी निधी मंजूर झाला.

कोपरगाव शहराच्या चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचा कंट्रोल कोपरगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत राहणार आहे. सीसीटीव्ही मंजूर करण्याचे काम खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले असल्याचे अहिल्यानगर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी सांगितले.

शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात तीन सीसीटीव्ही कॅमेरे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरात दोन सीसीटीव्ही कॅमेरे, साईबाबा कॉर्नर परिसरात दोन सीसीटीव्ही कॅमेरे, येवला नाका परिसरात तीन सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस स्टेशन हद्दीत दोन सीसीटीव्ही कॅमेरे, आचार्य हॉस्पिटल परिसरात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.

बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे कोपरगाव शहरातील सर्व हालचाली वर रात्रंदिवस लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे कोपरगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार असुन नागरिकांचा व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयोग होणार आहे.

हे काम खासदार लोखंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच मंजूर करून घेतले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्याची अंमलबजावणी सध्या होत आहे मात्र काही नगरपालिकेचे गुडघ्याला बाशिंग बांधलेले उमेदवार आपापल्या नेत्यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून काम आपल्याच नेत्यांनी केले असल्याचा गवगवा करीत आहे. त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी याचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेना नेत्या विमलताई पुंडे, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, मनिल नरोडे, सनी गायकवाड, मनोज राठोड यांनी जाहीर केले आहे.
