महत्त्वाच्या इतर रेल्वे गाड्यांचे थांबे मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार काळे

कोपरगाव रेल्वे स्टेशनला वंदे भारत एक्स्प्रेसचा अधिकृत थांबा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव रेल्वे स्टेशनचे संपूर्ण नूतनीकरण तसेच इतर विकास कामे पूर्ण होवून कोपरगाव रेल्वे स्टेशन सर्व सुविधांच्या बाबतीत अद्ययावत झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला कोपरगाव स्टेशनला अधिकृत थांबा दिला हि कोपरगावकरांसाठी व रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची व ऐतिहासिक गोष्ट असून हे विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

बहुचर्चित नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे रविवार (दि.१०) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनवर अधिकृत थांबा देण्यात आला असून कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन होताच आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून पुढील प्रवासाला वंदे भारत एक्स्प्रेस’ ला हिरवा झेंडा दाखविला.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ.आशुतोष काळे बोलत होते. यावेळी आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी कोपरगाव येथे आले असता त्यांच्यापुढे कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या मांडल्या होत्या. तसेच कोपरगाव रेल्वे स्टेशन व कोपरगाव विधानसभा मत्तदार संघातील रेल्वे प्रवासी व नागरिकांना येत असलेल्या अनेक समस्यांबाबत रेल्वेचे अपर महाप्रबंधक बी.के. दादाभोय यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेवून रेल्वेच्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले होते.

रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेवून २८.५ कोटींचा निधी कोपरगाव रेल्वे स्टेशनला मिळाला. त्या निधीतून ओव्हर हेड ब्रिज, बारा मीटर रस्ता व संपूर्ण रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण तसेच इतर विकास कामे पूर्ण होवून कोपरगाव रेल्वे स्टेशन सर्व सुविधांच्या बाबतीत कोपरगाव रेल्वे स्टेशन अद्ययावत झाले. या ठिकाणी प्रवाशांसाठी असणाऱ्या सोयी-सुविधांची नोंद घेवून रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव स्टेशनला अधिकृत थांबा दिला. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी रेल्वे मंत्री ना.अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

आगामी काळात कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या सुसज्जतेसाठी आणखी निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करून इतरही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. कोपरगावकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा म्हणजे विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या तालुक्याच्या लगत असलेल्या जगप्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी वंदे भारत एक्सप्रेसमुळे मोठी सोय होणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे.

त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली जावून त्याचा कोपरगावच्या अर्थकारणावर निश्चितपणे सकारात्मक परिणाम होतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी खा.भाऊसाहेब वाकचौरे, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे, रेल्वे विभागाचे अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.