कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव नगरपालीकेच्या स्वच्छता विभागाच्या ठेकेदाराच्या विरोधात पालीकेच्या स्वच्छता विभागात काम करणारे अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलनाचा पविञा घेतल्याने ऐन सणासुदीच्या काळात अर्थात गौरी, गणपती उत्सव काळात कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांनी पगार वाढीच्या कारणांमुळे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. घरोघरी गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु झाली असताना कोपरगावच्या नागरीकांच्या दारोदारी कचरा साचल्याने घरात दुर्गंधी सुरु झाली आहे. शहराच्या विविध भागातील नागरीक तक्रारी घेवून पालिकेच्या स्वच्छता विभागात धडकत आहेत.

कोपरगाव नगरपालीकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांच्या घरातील व रस्त्यावरील कचरा संकलन करणारा नाशिक येथील ठेकेदार यांच्या विरोधात स्वच्छता विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी पगार वाढवण्यासाठी मागणी केली. माञ संबंधीत ठेकेदार पगार वाढ न करता वाजवी काम करून घेत असल्याने अखेर वैतागलेल्या कामगारांनी घंटागाड्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर दारोदारी कचऱ्याची दुर्गंधी सुटली असुन काही नागरीकांनी रस्त्यावर व चौका चौकात कचरा फेकून शहराच्या आरोग्याचा प्रश्न गंभिर केला आहे.

काही सुज्ञ नागरीक पालीकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे जावून घंटागाड्या न आल्याच्या तक्रारी करीत सुज्ञपणा दाखवला आहे. पालीकेचे आरोग्य निरीक्षक सुनिल आरण यांनी संबंधीत ठेकेदार व आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांच्यामध्ये समेट घडवून शहराचं आरोग्य सुखरुप ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. माञ घंटागाडीवरील कर्मचारी आपल्या अनेक मागण्यांवर ठाम असल्याने संबंधीत आरोग्य विभागाचा ठेकेदार व कर्मचारी यांच्यातील वादामुळे सर्वसामान्य नागरीकांची हाल होत आहे.

गेल्या पाच दिवसांपासून वेळेवर कचरा संकलीत होत नसल्याने ऐन गणपती उत्सव काळातच दारोदारी कचऱ्याचे ढिग झाले आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करुन गेल्या अनेक दिवसांपासून घरात साठवल्याने गौरी गणपतीच्या सणात घराघरात दुर्गंधी सुटली आहे. पालीकेचा ठेकेदार चलती का नाम गाडी या प्रमाणे काम करतोय. पैसा घेतो पण कचरा उचलणार नाही असंच काही सध्या सुरु आहे.

ऐन सणासुदीच्या काळात कचरा उचलला गेला नसल्याने महिला वर्गातुन प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व घाणीचे साम्राज्य पसरले आहे अशातच कचरा संकलीत केला नाही तर घराघरात रोगराईला आमंत्रण देणारा कचरा साचुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणण्यासाठी पालीका प्रशासन प्रयत्नशील आहे का असा सवाल सर्वसामान्य नागरीकांना मनात उपस्थित होत आहे.

सध्या संबंधीत ठेकेदारांचे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे पालीका प्रशासनाची कोंडी झाली आहे. पालीकेचे आरोग्य निरीक्षक सुनिल आरण यांनी स्वतंत्र पालीकेची यंञणा वापरुन दारोदारी कचरा संकलनाचे काम सुरू केले असले तरी त्यांची यंञणा अपुरी पडत आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने नागरीकांच्या जीवाला धोका होणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित आहे.
