स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी भोसले

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार शेवगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक रविवारी बाजार समितीत आयोजित करण्यात आली होती. स्वाभिमानी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून मेजर अशोक भोसले यांची, तर शेवगाव शहर अध्यक्ष म्हणून दादेगावचे ग्रामपंचायत सदस्य अमोल देवढे यांची निवड करण्यात आली. तसेच हरिभाऊ कबाडी यांची युवक तालुका अध्यक्ष, तर युवक उपाध्यक्ष म्हणून विकास साबळे यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

मेजर अशोक भोसले हे घोटणचे असून श्री मल्लिकाअर्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय  सैन्यदलामध्ये जम्मू काश्मीर, आसाम, पंजाब,‌गुजरात, सिक्कीम, हिमाचल सारख्या दुर्गम भागांमध्ये सतरा वर्षे देशाची सेवा केली आहे. सेवानिवृत्तीनंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर त्यांनी लढा दिला. या कार्याची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, मच्छिंद्र आर्ले, प्रशांत भराट, रमेश कचरे, संतोष गायकवाड, दादासाहेब पाचरणे, नानासाहेब कातकडे, संघटनेचे जामखेड तालुका अध्यक्ष हनुमान उगले तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.