एसएसजीएम कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज (एसएसजीएम) विज्ञान, गौतम कला आणि संजीवनी वाणिज्य महाविद्यालयात साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या नवीन दोन मजली इमारतीचे भूमिपूजन तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अर्थशास्त्र विभाग नूतनीकरण, नॅक रूम, परीक्षा विभाग, कॉलेज कॅन्टीन, लेडीज हॉस्टेल डायनिंग हॉल इत्यादी विभागांचे उद्घाटन शनिवारी (२९ जुलै) रयत शिक्षण संस्थेचे उपध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे यांच्या हस्ते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी ॲड. भगीरथ शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ध्येय-धोरणानुसार संस्था शिक्षण प्रसाराचे काम करत असल्याचे सांगितले. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू केली. आज महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्थेचा विस्तार झाला असून, असंख्य विद्यार्थी या संस्थेच्या शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे ते म्हणाले.

विवेक कोल्हे यांनी एसएसजीएम महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेशी कोल्हे कुटुंबाचे आपुलकीचे व घनिष्ट नाते आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेक संकटांवर मात करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून आर्थिकदृष्ट्या मागास आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली.

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन करून कोपरगावसारख्या ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी रयत शिक्षण संस्थेवर अनेक वर्षे काम केले. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वाभिमानी विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न संस्थेने साकार केले आहे. ‘कमवा आणि शिका’ हा अभिनव उपक्रम संस्थेमध्ये आजही राबविला जात आहे.   

एसएसजीएम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगून कोल्हे म्हणाले, एसएसजीएम महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च पदांवर काम करत असून, ही कोपरगाव व एसएसजीएम महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. एसएसजीएम महाविद्यालय हे एक अतिशय प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालय आहे. येथील परिसर देखण्या इमारतीने नटलेला आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होत आहे .

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे अनेक नवीन कोर्सेस सुरू झाले आहेत. बीए, बीकॉम,बीएससी, बीबीए, बीसीए, एमए, एमकॉम, एमएस्सी, संशोधन केंद्र सुरू आहेत. कोपरगाव तालुका ही गुणवंतांची भूमी आहे. या भागातील अनेक विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’ सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून ग्रामीण भागातील मुले-मुली गुणवत्तेच्या बाबतीत कमी नाहीत हे सिद्ध केले आहे. कोल्हे परिवार आणि संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य केले जाते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. संदीप वर्पे, सुनील गंगुले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश सानप, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुभाष रणधीर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा.अरुण देशमुख, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, नॅकचे समन्वयक प्रा. डॉ. मालपुरे, प्रा. डॉ. तराळ, प्रा. डॉ. एस. एस. गायकवाड, प्रा. डॉ. शेंडगे, प्रा. डॉ. सीमा चव्हाण, प्रा. डॉ. भोर, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, महाविद्यालय विकास समितीचे प्रतिनिधी, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.