गणेश साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न मार्गी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : गणेश परिसरातील शेतकरी आणि कामगार हितासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याने कामगार बांधवांचा दीर्घकाळ प्रलंबित देणी असलेला प्रश्न मार्गी लावत मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून कामगारांनी केलेल्या योगदानाची दखल घेत १९८८ पासून थकीत असलेली देणी व २०१७ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, तसेच कार्यरत कर्मचाऱ्याची देणी अदा करण्यात आली असून कामगारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

यासह २०१७ पासून निवृत्त झालेल्या कामगारांची मिळून तब्बल ६ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी रक्कम मंजूर करून देण्यात आली आहे. प्रोव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युटी,फरक,थकीत पगार या थकबाकीचा निपटारा झाल्यामुळे पाचशे कार्यरत कर्मचारी व दोनशे सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कामगारांच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण झाली असून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी गणेश कारखान्याचे मार्गदर्शक व जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या प्रसंगी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, कामगार बांधवांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी कारखाना सुरळीत चालणे आवश्यक आहे. ही भूमिका ठामपणे मांडत आम्ही अनेक निर्णय घेतले आणि त्यातून बहुतांशी प्रश्न मार्गी लागले आहेत. उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठीही आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

ते पुढे म्हणाले की, सहकार चळवळ टिकवण्यासाठी शेतकरी सभासद, कारखाना कर्मचारी आणि संचालक मंडळ या तिहेरी ऐक्याची आवश्यकता असते. या ऐक्यामुळेच गणेश सहकारी साखर कारखान्याची गाडी सुरळीत धावते आहे. कामगारांची थकीत देणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो, त्यावेळी जो विश्वास दिला होता त्याची फलश्रुती आज प्रत्यक्षात दिसून आली आहे.

कामगारांच्या थकीत प्रश्नांची उकल आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देणगीची वेळेत सोडवणूक यामुळे गणेश कारखाना हा केवळ उत्पादनकेंद्र न राहता कामगारांचे खरे आश्रयस्थान असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply