कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा समितीने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये क्रीडा क्षेत्रात केलेली उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी लक्षात घेवुन व्यावसायिक महाविद्यालय गटात ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार देवुन समारंभपूर्वक गौरविले. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे ५० विविध व्यावसायिक शिक्षण संस्थामधुन हा उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाल्याने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे, ही बाब अधोरेखित झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. सुदाम शेळके, सिनेट सदस्य डॉ. रमेश गायकवाड, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, सचिव डॉ. राजेंद्रकुमार देवकाते यांचे हस्ते संजीवनी इंजिनिअरीग कॉलेजचे प्रतिनिधी डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. गणेश नरोडे व शिवराज पाळणे यांनी हा पुरस्कार अहिल्यानगर येथे स्वीकारला.

विद्यार्थी मैदानावर मैदानी खेळ आणि काही इनडोअर हॉल मधिल खेळ खेळले तर त्यांची शरीरयष्टी भक्कम होते, तसेच तितकेच ते अभ्यासात एकाग्र होतात, हा सिध्दांत आहे. या सिध्दांताला अनुसरून संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सर्व प्रकारच्या खेळांसाठी विस्तिर्ण मैदाने उपलब्ध करून दिली आहेत, आणि सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोणतेही सामने असले तरी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे खेळाडू त्यात बाजी मारणार, हे समिकरण बहुतांशी सत्यात उतरत आहे.

वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट प्रशिक्षित कोचेसची नेमणुक केलेली आहे. यामुळे संजीवनीचे विद्यार्थी थेट विद्यापीठाच्या संघांमधुन राज्य व देश पातळीवर खेळले आहेत. या सर्व बाबींची दखल घेवुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीने संजीवनी इंजिनिअरीग कॉलेजला ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ हा पुरस्कार देवुन गौरविले.

हा पुरस्कार संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे संस्थापक स्व. शंकररावजी कोल्हे यांना समर्पित करीत असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी, अमित कोल्हे यांनी सांगितले. यावेळी संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. एम. व्ही. नागरहल्ली, सर्व क्रीडा शिक्षक व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
