कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकतेच “समता युथ पार्लमेंट २०२५” या संसदीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संसदेच्या पवित्र व्यासपीठावर उभे राहून विद्यार्थ्यांनी समस्यांना भिडत उपाय योजना सुचवल्या आणि घणाघाती भाषण केले. त्यांच्या तडफदार शैली व आत्मविश्वासामुळे उपस्थितांना “हेच खरे भारताचे भावी नेतृत्व आहे” असा विश्वास वाटला.

या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना लोकशाही कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता. विद्यार्थ्यांनी ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर ठोस मांडणी करत भविष्यकालीन धोरणे सुचवली. या छोट्या वयात त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि देशाच्या प्रगतीसाठीची तळमळ यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक झाले.

कार्यक्रमाच्या यशामागे आध्य फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची मोलाची भूमिका होती. “विद्यार्थी केवळ अध्ययन केंद्री नसून समाज बदलविणारे सेनानी आहेत” हे ब्रीद त्यांनी या कार्यक्रमातून साकारले. संस्थेच्या सह-संस्थापक अनन्या विरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे संसदीय सत्राला नवी झळाळी प्राप्त झाली. शाळेचा माजी विद्यार्थी कुलदीप कोयटे याचे काटेकोर मार्गदर्शन व शिस्तबद्ध नियोजन या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

समता इंटरनॅशनल स्कूल संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी विद्यार्थ्यांचे हे सत्र म्हणजे प्रत्यक्ष मंत्रिमंडळाच्या कारभाराचा सजीव आरसा असल्याचे सांगितले. प्राचार्य समीर अत्तार यांनी “विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे मूल्य आत्मसात केले, तर तेच उद्या समाज परिवर्तनाचे खरे वाहक ठरतील” असे प्रतिपादन केले.

या उपक्रमात प्राथमिक विभाग प्रमुख जिज्ञासा कुलकर्णी, पूर्वी श्रीवास यांच्यासह शाळेचा क्रीडा विभाग, कला विभाग, वाहतूक विभाग व शालेय देखभाल विभाग यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. समता स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी सर्वांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “समता युथ पार्लमेंट २०२५” हा केवळ शालेय उपक्रम नव्हता, तर नव्या भारतनिर्मितीचा संकल्प आणि उद्याचे नेतृत्व घडविणारा प्रेरणादायी अनुभव होता.

“समता युथ पार्लमेंट २०२५” हा केवळ शालेय उपक्रम नव्हता, तर तो विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देणारा प्रेरणादायी अनुभव ठरला. विद्यार्थ्यांनी संसदेच्या पवित्र व्यासपीठावर उभे राहून ज्या आत्मविश्वासाने समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले, उपाययोजना सुचवल्या आणि भविष्यकालीन धोरणे साकार केली, ते पाहून प्रत्येकाला ‘हेच खरे भारताचे भावी नेतृत्व आहे’ असा विश्वास वाटला. विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे मूल्य आत्मसात करून समाज परिवर्तनासाठी कार्य करावे, हीच खरी अपेक्षा. – सौ.स्वाती संदीप कोयटे, कार्यकारी विश्वस्त
