एक महिन्याच्या आत मंजूर कामे पूर्ण करून घ्या

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : उर्जा विभागाच्या दुरुस्तीच्या कामासाठी आर.डी.एस.एस.,कृषी वीज धोरण, जिल्हा नियोजन समिती अशा विविध विभागातून निधी उपलब्ध आहे. हि सर्व मंजूर कामे एक महिन्याच्या आत सबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्या. जे ठेकेदार वेळेत काम करणार नाही अशा कामचुकार ठेकेदारावर कारवाई करा मात्र नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  आमदार काळे यांनी नुकतीच कोपरगाव येथे महावितरणच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोपरगाव शहरासह मतदार संघातील उर्जा विभागामार्फत सुरु असलेल्या कामांचा आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या अडचणी या बैठकीत जाणून घेतल्या.

अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, कृषी धोरण व जिल्हा नियोजन अंतर्गत कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील अनेक गावात मंजूर असेलल्या कामापैकी बहुतांश कामे अपूर्ण असून हि कामे तातडीने पूर्ण करा. उन्हाचा पारा वाढला आहे अशा परिस्थितीत कृषी पंपाचे वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना वीज रोहित्र लवकर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी पाणी कसे उपलब्ध करायचे व उभ्या चारा पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कृषी पंपाचे वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यास तातडीने वीज रोहित्र उपलब्ध करून द्या.

शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या. वादळ व अतिवृष्टीमुळे वाकलेले विजेचे पोल व लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्यांची कामे तातडीने पूर्ण करा. कोपरगाव शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असून किरकोळ कामाच्या दुरुस्तीसाठी निम्म्या शहराचा वीज पुरवठा खंडीत केला जातो याबाबत योग्य उपाय योजना करा.

कोपरगाव शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात पथदिवे बसविण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी यावेळी या बैठकीत चर्चा केली. तसेच वारी वीज उपकेंद्राच्या क्षमता वाढ काम, ब्राम्हणगाव वीज उपकेंद्राचे सुरु असलेले काम व चांदेकसारे येथील मंजुरी प्रक्रियेत असलेल्या वीज उपकेंद्राच्या कामांबाबत आ. आशुतोष काळे यांनी सखोल आढावा उपस्थित अधिकाऱ्यांकडून यावेळी घेतला.

      यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, भगवंत खराटे, डी. डी. पाटील, मतदार संघातील सर्व विभागाचे सहाय्यक अभियंता, तसेच विलास चव्हाण, शरद होन, सचिन होन, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, हसन सय्यद, ज्ञानेश्वर गव्हाणे, संदीप कपिले आदी उपस्थित होते.