समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : माझं काम म्हणजे खुलं किताब आहे मी कधीच बंद खोलीत चर्चा करत नाही किंवा घरात बसुन चर्चा करीत नाही पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नाही म्हणुनच समृध्दी महामार्गासारखे मोठे महत्वकांक्षी प्रकल्प पुर्ण करु शकलो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर निशाना साधला.
नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कोपरगाव ते इतगतपुरी येथील भरवीर या ८० किमीच्या महामार्गाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दुपारी कोपरगाव येथील कोकमठाण सर्कल येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, हेमंत गोडसे, आमदार राम शिंदे, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार किशोर दराडे, मोनिका राजळे, रमेश बोरणारे,शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, राजेश परजणे, वैभव पिचड, राज्याचे मुख्यसचिव मनोज सवनिक, राधेश्याम मोपलवार, राधाकृष्ण गमे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या पुर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे समृध्दी महामार्गाच्या पहील्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी कोपरगाव या दरम्यानच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. आता कोपरगाव, शिर्डी ते भरवीर या समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील सर्कलच्या आवारात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राधेशाम मोपलवार यांनी समृध्दी महामार्गाची रूपरेषा व भविष्यातील रस्त्यांचा आराखडा सांगितला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या कामाला अनेकांनी जाणुनबुजून अडथळा आणला, अनेक ठिकाणी विरोध केला काहींनी विरोध करायला भाग पाडला पण आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळतो. दिलेला शब्द पाळण्याची सवय आम्हाला आहे. आम्ही जे जाहीरपणे बोलतो तेच करुन दाखवतो. म्हणुनच शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली आणि आज हजारो नागरिकांना एका छताखाली सर्व काही मिळत आहे.
हे आमचं सरकार गतिमान सरकार आहे म्हणूनच अवघ्या काही दिवसांत समृध्दी महामार्गाच्या कामाची गती वाढवून विकासाला चालना देत असल्याचे सांगून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्गाला त्वरीत जमिनी दिल्या बद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, समृध्दी महामार्गाच जगाने पहायला यावा असा तयार झाला आहे. नविन प्रोजेक्ट आपण करतोय. नागपूर गोवा महामार्गामुळे मराठवाड्यातील चिञ बदलणार असून आम्ही फाईलवर बसणारे किंवा आडवणारे नाही तर तर जनतेचे काम करणारे आहोत. येत्या काळात समृध्दी महामार्गावरील पहिली स्मार्ट सिटी कोपरगाव तालुक्यात होणार असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून शिंदे फडवणीस यांच्या कार्याचे कौतुक केले.