शेवगावात भाजप पक्षीय नाराजी विकोपाला गेल्याचे संकेत?

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ :  राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रथमच तालुक्यात आले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. नामदार विखे यांचा  तालुक्यासी तसा दांडगा संपर्क असल्याने ते कुठेही असले तरी लोक त्यांचे जवळ मोहोळा सारखी गर्दी करतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे.

    आज  नामदार विखे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले. हा कार्यक्रम तसा सर्वपक्षीय असतानाही त्यांच्या दौऱ्याचे नियोजन जमले नसल्याने  त्यांच्या सभेला म्हणावी तेवढी गर्दी आढळली नाही. काही दिवसापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचाही शेवगावी दौरा झाला, त्यावेळीही नियोजनाचा मोठा अभाव जाणवला. त्यांच्या कार्यक्रमात तर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही बहुतेक खुर्च्या मोकळ्या होत्या.

अलीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अवमेळ झाल्याचे जाणवते. पक्षाचे कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नामदार विखे  तालुक्यात येतात याची कल्पना पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नसावी काय? अशी शंका येते. या कार्यक्रमास मंत्र्याच्याच पक्षाचे, भाजपाचे  तालुका अध्यक्ष, किसान सभेचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य, तसेच  कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब भोसले सारखे  ज्येष्ठ नेते उपस्थित नव्हते.

        शेवगावच्या लोकप्रतिनिधी महत्वाच्या कामा निमित्त बाहेर असल्याचे समजले, तरीही बोधेगाव, बालमटाकळी परिसरात कार्यक्रमाच्या लावलेल्या  डिजिटल फ्लेक्स बोर्डवरील फोटो वरून आणि  होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रेस नोटच्या बातमीमधून लोकप्रतिनिधी आमदार मोनिकाताई राजळे गायब आहेत. ह्यावरून पक्षीय नाराजी विकोपाला गेल्याचे संकेत झाकून राहिले नाहीत.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी  करण्यासाठी  ना . विखे पाटील आल्याबद्दल आभार व्यक्त करून  ते हेलिकॉप्टरने न येता त्याऐवजी कारने आले असते, तर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत तर झालेच असते शिवाय त्यांना परिसरातील अत्यंत खराब रस्तेही पहाता आले असते. अशी बोलकी प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी व्यक्त केली आहे.