राज्यशासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी – नामदार विखे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव तालुक्यातील तब्बल साठ हजार हेक्टर क्षेत्रातील विविध पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाले. त्यात कपाशीचे क्षेत्र जास्त असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून येत्या आठ दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

आज मंत्री  विखे  यांनी तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, लाड जळगाव, बालमटाकळी आदी भागातील  शेतकऱ्यांकऱ्याच्या झालेल्या नुकसणीची पहाणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करण्यात येईल. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या दुपटीने नोंद झाली आहे.

     तालुक्याच्या पूर्व भागात जवळपास ९० टक्के नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील ४१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होऊन जवळपास २० लाख रुपयांचा पीकविमा उतरविला. पीक विम्याचे स्वरक्षित क्षेत्र २१ हजार हेक्टरच्या आसपास असून शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला कळविण्याची जाचक अट शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे.

ग्रामीण भागातील शेतक-यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो . तर अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने नोंदी घेण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने मर्यादित वेळेची, इ पीक पहाणीची जाचक अट प्रसंगी शिथिल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना मदत देताना २ हेक्टर ची मर्यादा ३ हेक्टर पर्यंत वाढविण्याचा तसेच जिरायत, बागायत क्षेत्र बरोबर फळ बागांच्या नुकसानीची मदत निधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकरी मदतनिधी पासून वंचित राहणार नाही. असा शासनाचा प्रयत्न असल्याचेही  विखे यांनी सांगितले. मंत्री विखे यांनी बोधेगाव गिरीअप्पा महाराज, सुरेश दातीर, लाडजळगाव येथील विठ्ठल घाडगे, शिवकुमार मानूरकर, शिवाजी म्हस्के, आदी शेतकऱ्यांच्या शेतबांधवर जाऊन  कपाशीच्या नुकसानीची पाहणी केली.

      या दौऱ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जीप सदस्य नितीन काकडे, तुषार वैद्य, कचरू चोथे, बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, गणेश ढाकणे, पांडुरंग तहकीक, काकासाहेब तहकीक, दत्ता तहकीक, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार छगनराव वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, विभागीय  कृषी अधिकारी विलास नलगे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, गटविकास अधिकारी महेश डोके, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी शेतकरी उपस्थित होते.

     ना. विखे हे बोधेगाव येथे बन्नोमाँ दर्ग्याच्या परिसरात आले असताना भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सोनटक्के, धोंडिबा मासळकर, बनेमिया शेख, संगीता ढवळे यांनी काळे कपडे परिधान करून नुकसानीचा पाहणीचा फार्स न करता नुकसानीची सरसकट पंचनामे  करून शेतकऱ्यांना तातडीने  आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली असता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन शेवगावी आणले. दुपारी साडेतीनला त्यांना नोटिसा बजावून सोडण्यात आले.  तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष  प्रा.किसन चव्हाण व तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांना आज सकाळीच  सहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते .मंत्री विखे  गेल्यानंतर त्यांना पोलीस  ठाण्यातून सोडण्यात आले.