शिंदे-फडणवीस सरकारने गरीबांची दिवाळी गोड केली – दत्ता काले

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गोर गरीब स्वस्त धान्य लाभार्थ्यांना साखर, रवा, चनादाळ आणि गोडेतेल या चार वस्तु अवघ्या शंभर रूपयांत देवुन त्यांची दिवाळी आनंदाच्या शिध्याने गोड केली आहे असे प्रतिपादन कोपरगांव भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले. 

           शहरातील टिळकनगर भागातील सौ. एम. डी. लहिरे यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२० मध्ये गोर गरीबांना आनंदाचा शिधा वाटप व्यवस्थीत व्हावा याबाबतची पाहणी भाजपाच्यावतीने करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे होते. 

          प्रारंभी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक प्रास्तविक करतांना म्हणाले की, कोपरगांव शहरासह मतदार संघावर चार दिवसापुर्वी अतिवृष्टी झाली त्यात गोर गरीबांचे प्रचंड हाल झाले संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी रातोरात संजीवनी आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्फत घटनास्थळी मदत पाठवुन अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या कुटूंबाला निवारा, चहापान, नाष्टा व भोजनाची सोय उपलब्ध करून दिली. अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांसह शेतक-यांचे प्रचंड हाल झाले. त्यांच्यापुढे दिवाळसण कसा साजरा करायचा याची चिंता होती मात्र शिंदे फडणवीस शासनाने गोर गरीब व दारिद्रयरेषेखालील स्वस्त धान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे. 

काले पुढे म्हणाले की, कोपरगांव शहरासह संपुर्ण मतदार संघात दिवाळसणासाठी आनंदाचा शिधा व्यवस्थीतरित्या वाटप व्हावा यासाठी तहसिलदार विजय बोरूडे, पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या अडचणी समजावून घेत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी आवश्यकता भासेल तेथे संजीवनी यंत्रणेच्या माध्यमातुन मदतकार्य उपलब्ध करून दिले आहे शंभर रूपयात साखर, रवा, चनादाळ व गोडेतेल आनंदाचा शिधा लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून दिवाळसणाचा आनंद द्विगुणित केला आहे. लाभार्थ्यांनी देखील महाराष्ट्र शासनाचे व अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आभार मानले आहे. 

          याप्रसंगी सर्वश्री. माजी गटनेते रवींद्र पाठक, जगदिश मोरे, खालिकभाई कुरेशी, सतिश रानोडे, सचिन कोल्हे, अशोक लकारे, दादासाहेब नाईकवाडे, दिपक जपे, किरण सुपेकर, सचिन सावंत, सुनील पांडे, फकीर मोहम्मद पहिलवान यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी माजी गटनेते रवींद्र पाठक यांनी आभार मानले.